⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

Big Breaking : शिवसेनेकडून ‘तो’ प्रस्ताव म्हणजे रडीचा डाव : एकनाथ शिंदे

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२२ । पक्षाची विधिमंडळ बैठक बोलावली असताना थातूर मातूर कारणे देत गैरहजर राहिल्याने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह १३ आमदारांची आमदारकी रद्द करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेकडून विधानसभा उपाध्यक्षा नरहरी झिरवाळ यांच्याकडे करण्यात आली होती. एकनाथ शिंदे यांनी देखील ट्विट करीत कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय? तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो! घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत. असे म्हटले होते. दरम्यान, आज पुन्हा ४ आमदारांची आमदारकी रद्द करण्याचा प्रस्ताव शिवसेनेकडून दिला जाणार आहे. एकनाथ शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना, शिवसेनेचा आमदार निलंबनाचा प्रस्ताव म्हणजे रडीचा डाव असल्याचे म्हटले आहे.

राज्यात एकनाथ शिंदे विरुद्ध शिवसेना असे चित्र पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात सध्या ४५ पेक्षा अधिक आमदार असून त्यांनी शिवसेना विरोधात बंड पुकारले आहे. बंडखोर आमदारांचे बंड खोडून काढण्यासाठी शिवसेनेसह मविआ देखील मैदानात उतरली आहे. शिंदे यांचे बंड मोडून काढण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरु होते. बंडखोरांना पुन्हा बोलाविण्यासाठी शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभु यांनी एक पत्र शिवसेनेच्या सर्व आमदारांना पाठवलं होते. पत्रकात सर्व आमदारांना ५ वाजेपर्यंत मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले होते. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी ट्विट करीत शिवसेना प्रतोदांनी काढलेला व्हीप बेकायदेशीर असल्याचे त्यांनी म्हटले होते. तत्पूर्वी शिवसेनेने शिंदे यांना गटनेते पदावरून हटवित अजय चौधरी यांची नियुक्ती केली होती. शिंदे यांनी त्यावर देखील ट्विट करीत निवड बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क नसला तरी माध्यमांना ते वारंवार प्रतिक्रिया देत आहे. एकनाथ शिंदे यांनी आज एका वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितले कि, आमदारांचे निलंबन होऊच शकत नाही. आमच्याकडे जास्तीचे संख्याबळ आहे. पक्षाच्या बैठकीसाठी जारी केलेल्या व्हीपला फारसे महत्व नसते. शिवसेनाकडून पाठविण्यात येत असलेले आमदार निलंबनाचे प्रस्ताव म्हणजे रडीचा डाव आहे. आम्हाला कायद्याचे ज्ञान असून वेळ आल्यावर आम्ही आमची बाजू मांडणार आहोत, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

राज्यात सध्या शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे गट असे चित्र पाहायला मिळत आहे. राज्यभर शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले असून दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी बॅनरबाजी सुरु केली आहे. एकनाथ शिंदे हे स्व.बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा हिंदुत्वाचा वारसा पुढे नेत असल्याचे बॅनरवर म्हटले आहे. शिवसेना समर्थक देखील शिंदेंच्या विरोधात नाराजी व्यक्त करीत असून सोशल मीडियात तशा पोस्ट व्हायरल होत आहे. अनेक ठिकाणी बंडखोर आमदारांचे पुतळे दहन, पुतळ्याला जोडे मारो आंदोलन देखील केले जात आहे.