⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

शिवसेना आमदार किशोर पाटील यांच्या बंडखोरीला कुटूंबातूनच आव्हान!

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२२ । पाचोरा-भडगाव (Pachora Bhadgaon) विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे (Shivsena) आमदार किशोरआप्पा पाटील (Kishor Patil) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. शिंदे यांच्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी पदरात पाडून घेतला आहे. त्याचे प्रतिबिंब शहराच्या विकासात दिसून येते. एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरेंची (Uddhav Thackeray) साथ सोडल्यानंतर त्याच्या समवेत किशोर पाटील देखील शिंदे गटात सहभागी झाल्याने पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. आम्ही शिवसेना सोडलेली नाही, असे किशोर पाटील म्हणत असले तरी शिवसेना विरुध्द शिंदे सरकार असे स्पष्ट चित्र निर्माण झाले आहे. किशोर आप्पा यांच्या पाठोपाठ अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते शिंदे गटात गेल्याने आप्पांना आव्हान देणार कोण? असा प्रश्‍न उपस्थित होत असतांना शिवसेनेचे माजी आमदार आर.ओ.पाटील यांच्या कन्या वैशाली सुर्यवंशी यांनी मैदानात उडी घेतली आहे. त्या किशोरआप्पा यांची चुलत भगिनी आहेत. यामुळे किशोर पाटील यांच्या बंडखोरीला कुटूंबातूनच आव्हान मिळाले आहे. Shiv Sena MLA Kishor Patil challenged by the family

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज काही वृत्तपत्रांमध्ये एक जाहिरात प्रकाशित झाली आहे. यात शुभेच्छुक म्हणून वैशाली नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांचे नाव आहे. सोबतच शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व लोक प्रतिनिधी, पदाधिकारी सर्व शिवसैनिक पाचोरा-भडगाव असा उल्लेख करण्यात आला आहे. शिवसेनेच्या राजकीय पटलावर अचानक वैशाली सुर्यवंशी यांचे नाव आल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या गेल्या आहेत. याचे मुख्य कारण म्हणते त्या माजी आमदार आर.ओ.पाटील यांच्या कन्या असून किशोरआप्पा यांच्या भगिनी आहेत.

पोलीस कॉन्स्टेबल पदाचा राजीनामा देवून राजकारणात प्रवेश
माजी आमदार आर.ओ. पाटील यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्यांनी पुतणे किशोर पाटील यांना राजकारणात आणले. त्याआधी किशोर पाटील पोलीस खात्यात कामाला होते. काकांच्या आग्रहाखातर किशोर पाटील यांनी पोलिस कॉन्स्टेबलपदाचा राजीनामा देवून राजकारणात प्रवेश केला. २००१ मध्ये ते पाचोरा नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. तेंव्हापासून त्यांच्याकडे आर.ओ.तात्यांचे राजकीय वारसदार म्हणूनच पाहिले गेले. जेव्हा आर.ओ.पाटील यांनी आमदार म्हणून निवडणूक लढवायची नाही असं ठरवलं तेव्हा तात्यांनीच किशोर आप्पांचे नाव पुढे केले. सन २०१४ मध्ये किशोर आप्पा आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले. त्यानंतर काकांप्रमाणे २०१९ मध्येही विधानसभा निवडणुकीत किशोर आप्पांनी विजय मिळवला. आर.ओ.तात्यांनंतर सबकुछ किशोरआप्पा असेच चित्र राहिले आहे.

आर.ओ.तात्या पाटील यांचे निधन
पाचोरा-भडगाव मतदारसंघात के. एम. पाटील व ओंकार वाघ यांनी ४५ वर्षे राजकारण केले. सन १९९९ मध्ये प्रथमच शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवून आर. ओ. पाटील यांनी ओंकार वाघ यांचा पराभव केला. ते शिवसेनेचे तालुक्यातील पहिले आमदार म्हणून निवडून आले. मात्र २००९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यानंतर ते राजकारणापासून दूर गेले. आपण भले आणि आपला व्यवसाय बरा, असे धोरण त्यांनी स्विकारले. मात्र लोकसभा निवडणुक लढविण्याची त्यांची इच्छा होती. २०१८ पासून त्यांची तशी तयारी देखील सुरु केली होती. त्यांना मानणारा मोठा वर्ग असल्याने स्वत: उद्धव ठाकरे यांनी तात्यांना जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी शब्द दिला होता. १५ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रचाराचे नारळही फुटणार होते. मात्र, दुर्दैवाने पाटील यांना अचानक स्वादूपिंडाच्या कर्करोगामुळे उपचारासाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागले व त्याचवेळी त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या कन्या निर्मल सीड्स कंपनीत सक्रिय झाल्या त्याआधी त्या निर्मल इंटरनॅशनल या शाळेचे काम पाहत होत्या. दरम्यानच्या काळात त्यांनी राजकारणापासून स्वत:ला पूर्णपणे अलिप्‍त ठेवले होते. मात्र आता त्या अचानक राजकीय वर्तुळात सक्रिय होतांना दिसत आहेत. उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने संपूर्ण मतदार संघात लागलेली त्यांची शुभेच्छा फलके आगमी राजकीय वाटचालीची दिशा दाखवत आहे.

मतदारसंघात प्रभावशील समीकरणे
किशोर पाटील शिंदे गटासोबत गेल्याने शिवसेनेने या मतदारसंघात पर्यायी उमेदवाराचा शोध सुरु केला होता. किशोर पाटील यांचा दांडगा जनसंपर्क व अनुभव लक्षात घेता त्यांना शिवसेनेतून तोडीसतोड उमेदवार मिळणार नाही, अशी अटकळ बांधली जात होती. कारण सेनेच्या जुन्या व ज्येष्ठ नेत्यांनी अजूनही पूर्ण पत्ते उघड न केल्याने सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये संशयकल्लोळच दिसून येत आहे. यापार्श्‍वभूमीवर शिवसेनेकडून आर.ओ.तात्यांच्या मुलीलाच किशोरआप्पांच्या विरोधात उभे करण्याची मुत्सद्दी खेळी शिवसेनेकडून खेळण्यात आल्याचे दिसते. यामुळे आता मतदारसंघातील चुरस आतापासूनच वाढली आहे. या मतदारसंघात मराठा समाजाचे प्राबल्य आहे. त्याचप्रमाणे मुस्लीम, राजपूत, माळी, गुर्जर, बौद्ध यासह इतर समाज देखील बहुसंख्येने आहेत. आतापर्यंत या मतदारसंघात मराठा समाजाचे आमदार निवडून येत होते. मात्र, १९९९ व २००४ मध्ये आर. ओ. पाटील तर त्यांच्यानंतर २०१४ व २०१९ मध्ये किशोर पाटील हे राजपूत समाजाचे आमदार निवडून आले आहेत. यामुळे येणार्‍या निवडणुकीत कोणाचे पारडे जड ठरते? याचे उत्तर निवडणुकीनंतरच मिळेल.