मनपात सर्वपक्षीयांना धक्का देण्यासाठी शिवसेना तयार !
जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मे २०२३ । जळगाव शहर महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या तीन महिन्यावर येऊन ठेपली आहे अशावेळी या महानगरपालिकेवर स्वतःचा महापौर बसवण्यासाठी म्हणजेच सत्ता मिळवण्यासाठी शिवसेना शिंदे गटाने रणनीती आखायला सुरुवात केली आहे. नुकतीच याबाबतची बैठकही झाली.
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळालेल्या धक्क्यानंतर शिवसेना जळगावमध्ये आता पुन्हा उभी राहायचा प्रयत्न करत आहे. यातच सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिल्यामुळे शिवसेनेमध्ये नवचैतन्य दिसून येत आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यावर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा असा निर्धार शिवसेनेत झाल्यामुळे महानगरपालिकेमध्ये ही भगवा फडकवायचा हा निर्धार शिवसेनेने केला आहे
नुकतीच अजिंठा विश्रामगृहात मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिंदे गटाकडून एक महत्त्वाची बैठक घेण्यात आली. नगरसेवक गणेश सोनवणे, चेतन संकट, नवनाथ दारकुंडे, हर्षल मावळे, नगरसेविका ज्योती चव्हाण, प्रतिभा देशमुख यांच्यासह पक्षाच्या पदाधिकारी रेखा पाटील, शोभा चौधरी, आशुतोष पाटील, सोहम विसपुते यावेळी उपस्थित होते.