जळगाव : शिवसेना जळगाव महानगर व इंडियन रेडक्रॉस सोसायटीची जळगाव जिल्हा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या रविवार, दि. 9 मे 2021 रोजी ‘कोरोना’ अर्थात ‘कोविड-19’ अॅन्टीजेन मोफत तपासणी शिबिर आयोजित केले आहे. शहरातील तुकारामवाडी-गणेशवाडी परिसरातील पडकी विहीर, चिंचेच्या झाडाजवळ सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत शिबिर घेण्यात येईल.
महापौर सौ. जयश्री महाजन यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होणार असून, माजी महापौर नितीन लढ्ढा प्रमुख अतिथी असतील. शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुनील महाजन, शिवसेना महिला आघाडीच्या महानगरप्रमुख शोभा चौधरी, इंडियन रेडक्रॉस सोसायटी, जळगावचे उपाध्यक्ष गनी मेमन, विनोद बियाणी, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप शिकारे यावेळी उपस्थित राहतील.
ज्या नागरिकांना ‘कोरोना’ची सौम्य लक्षणे जाणवत असतील त्यांनी घाबरण्याचे अजिबात कारण नाही. शिबिरात डॉ. प्रमोद खिंवसरा अॅन्टीजेन तपासणी करून मार्गदर्शन करतील. शिबिरस्थळी येताना नागरिकांनी शासकीय नियमांचे पालन करणे आवश्यक असून, तोंडाला मास्क लावण्यासह सोशल डिस्टन्सिंग पाळणे महत्त्वाचे आहे. शिबिर मोफत असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसैनिक तथा युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक विराज कावडिया यांनी केले आहे.