जळगाव लाईव्ह न्यूज । गौरी बारी । जळगाव शहरातील मेहरूण भागाची एक वेगळीच ओळख आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आणि विशेष चवीच्या बोरांनी प्रसिद्ध असलेल्या मेहरूणची अनेक वैशिष्ट्ये आहेत. मेहरूणचा इतिहासही काहीसा वेगळा असून गावाच्या सुरुवातीलाच असलेले दुर्गाभवानी मंदिर चारशे वर्षांपूर्वीचे आहे. मुघलांच्या काळात जुना किल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेहरूण भागात दुर्गाभवानीचे जागृत देवस्थान उभारण्यात आले होते.
ऐकताना नक्कीच नवीन वाटेल पण हो जळगावात असलेल्या मेहरूण भागातील दुर्गाभवानीचे हे मंदिर मुघल काळातील असून चारशे वर्षांपासून इथे दुर्गाभवानीचा वास आहे. सन १६५६ मध्ये कै. यशवंतराव बळवंतराव पाटील व जयवंतराव हिबुजीराव पाटील यांनी हे मंदिर बांधलं. मंदिरासोबतच मंदिराला लागून विहीरदेखील बांधण्यात आली. जुन्या काळात या विहिरीचा देखील बऱ्यापैकी वापर होत होता. परंतु कालांतराने वापर कमी झाला आणि हि विहीर बुजवण्यात आली. मंदिराच्या मागच्या बाजूला अनेकवर्ष जुनं वडाच झाड आहे. येथील ग्रामस्थ मंदिराची व वडाच्या झाडाची नित्यपणे पूजाअर्चा करून निगा राखत असतात.
पूर्वीच्या काळात मेहरूण परिसर छोटा किल्ला म्हणून समजला जात होता. पूर्व खान्देश विभागात मेहरूणची आपली वेगळी ओळख होती. विशेषतः मुघलांचे तेव्हा राज्य होते. चारशेवर्षा पूर्वीच्या या दुर्गाभवानी मंदिराचे गतवर्षी विरोधीपक्ष नेते सुनील महाजन यांनी सुशोभीकरण करून या मंदिराला नवे रूप दिले. येथील नागरिक आपल्याघरातील शुभकार्याची सुरवात दुर्गाभवानीचे दर्शन घेऊनच करत असतात.
नवरात्र महोत्सवाला मंदिरावर रोषणाई केली जाते. येथील ग्रामस्थांच्या वतीने अनेक सांस्कृतिक कार्यक्रम देखील घेतले जातात. नवरात्रीच्या काळात येथे महिला देवीचा पाठ देखील करत असतात. दरवर्षी भव्य भंडाऱ्याचे आयोजन करून समस्त भाविकांना महाप्रसाद दिला जातो. यंदा कोरोनाच सावट पाहता नित्यनियम पळून दुर्गाभवानी मातेची पूजा-पाठ करीत भाविक देवीची मनोभावे सेवा करत आहेत. कैलास शिर्सोले व प्रदीप महाजन हे पुजारी मंदिरात सेवा बजावतात.
देवीच्या दर्शनाला कसे पोहचणार?
दुर्गा भवानी मंदिर मेहरूण परिसरात सर्वांना परिचित आहे. जळगाव बसस्थानकावरून इच्छादेवी चौफुलीवर आल्यावर तांबापुरा मार्गे किंवा जुन्या वखारीच्या रस्त्याने मेहरूणच्या मुख्य चौकाजवळच मंदिर आहे. शिरसोली, मोहाडी, काव्यरत्नावली चौक मार्गे आल्यास डी मार्टकडून तांबापुराकडून सरळ मार्गाने थेट मंदिराकडे पोहचता येईल. विद्यमान महापौर जयश्री महाजन व विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्या घरासमोरच दुर्गा भवानी मातेचे देवस्थान आहे.