जळगावच्या बळीराजावर ‘सुपर एल निनो’चे सावट; मान्सून काळात पावसाचा मोठा खंड पडण्याची शक्यता

जून 11, 2026 12:06 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्यानंतर यंदाच्या मान्सून हंगामात मात्र जळगाव जिल्ह्यासाठी चिंताजनक संकेत समोर येत आहेत. हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या ताज्या अंदाजानुसार, यंदा ‘सुपर एल निनो’ परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यात पावसाचे वितरण असमान राहून पावसात मोठा खंड, म्हणजेच ‘ड्राय स्पेल’ (दीर्घकाळ कोरडे वातावरण) येण्याचा धोका कमालीचा वाढला आहे. याचा थेट परिणाम खरीप हंगामातील पेरणी, पिकांची वाढ आणि शेतकऱ्यांच्या एकूणच नियोजनावर होऊन ते विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ps

गेले वर्ष हे ‘ला निना’चे वर्ष असल्याने जळगाव जिल्ह्यासाठी ते अत्यंत फायदेशीर ठरले होते. अनेक तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच लहान-मोठ्या जलप्रकल्पांमध्ये १०० टक्के जलसाठा झाला होता. विशेष म्हणजे, पावसाळ्यातील जून ते सप्टेंबर या १२२ दिवसांच्या मुख्य कालावधीत संपूर्ण हंगामात केवळ १० दिवसच पावसाचा ‘ड्राय स्पेल’ (पावसाचा खंड) पाहायला मिळाला होता. त्यामुळे पिकांची स्थिती उत्तम होती.

यंदा ‘सुपर एल निनो’चे मोठे आव्हान

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मात्र परिस्थिती चिंताजनक आहे. हवामान बदलांमुळे यंदा ‘सुपर एल निनो’ची स्थिती निर्माण होत आहे. यामुळे मान्सूनच्या काळात पावसाचा खंड (ड्राय स्पेल) वाढण्याचा मोठा धोका आहे. हवामान अभ्यासकांच्या मते, यंदा एल निनोची तीव्रता वाढल्यास पावसाचे वितरण असमान राहू शकते. काही भागांत मुसळधार पाऊस तर काही भागांत दीर्घकाळ कोरडे वातावरण राहण्याची शक्यता आहे. जर हा पावसाचा खंड अपेक्षेपेक्षा जास्त काळ रेंगाळला, तर त्याचा थेट आणि मोठा फटका जिल्ह्यातील खरीप हंगामाला बसण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. पाऊस कमी झाल्यास जिल्ह्यातील धरणांमधील जलसाठ्यावरही याचा विपरीत परिणाम होऊन रब्बी हंगामालाही झळ पोहोचू शकते.

जिल्ह्यातील पूर्वीच्या नोंदींवरून ड्राय स्पेलचे प्रमाण काही वर्षांत लक्षणीय वाढल्याचे दिसून येते. विशेषतः २०१९ मध्ये दीर्घकाळ पावसाचा खंड पडल्याने अनेक भागांतील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. यंदाही अशीच परिस्थिती निर्माण झाल्यास खरीप हंगामावर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन पीक नियोजन करावे, असा सल्ला देण्यात येत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now