नवीन स्कूटर घेण्याचा प्लॅन करताय? ‘या’ सात स्कूटर होणार लॉन्च..

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२३ । सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जिथे फारशी सक्षम नाही, अशा ठिकाणी नेहमीच खासगी वाहतूक व्यवस्था अर्थात स्वतःच्या वाहनांवर अवलंबून राहावे लागते. यातही चारचाकीपेक्षा दुचाकी अधिक सोयीची असल्याने तिला जास्त मागणी असते. हेच लक्षात घेऊन अनेक नवीन दुचाकी या महिन्यात येऊ घातल्या आहेत. मार्च महिन्यात सात बाईक आणि स्कूटर लाँच केल्या जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार यात सामान्य बाईक तसेच सुपरबाइक आणि इलेक्ट्रिक स्कूटरचा समावेश आहे. याचीच माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

होंडाची स्वस्त बाईक
होंडाची नवीन बाईक १५ मार्च रोजी लॉन्च होणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ही बाईक १०० सीसी सेगमेंटमध्ये आणली जाईल. ही बाईक हिरो स्प्लेंडर बजाजसारख्या १०० सीसी बाईकला आव्हान देऊ शकते. या बाईकमध्ये १०० सीसी इंजिन आहे. एक लीटर पेट्रोलमध्ये ही बाईक ६० ते ७० किलोमीटरपर्यंत चालवता येते. त्याची किंमत ६० ते ६५ हजार रुपयांपर्यंत असू शकते.

बजाज पल्सर
नवीन पल्सर २२० एफ देखील या महिन्यात बजाजकडून लॉन्च होऊ शकते. यासाठी काही शोरूममध्ये बुकिंगही घेतले जात आहे. यात २२० सीसीचे सिंगल सिलेंडर एअर-कूल्ड एफआय इंजिन असण्याची माहिती मिळते आहे.

ट्रायम्फ स्ट्रीट ट्रिपल
ट्रायम्फ बाइक्सद्वारे नवीन स्ट्रीट ट्रिपल आणि स्ट्रीट ट्रिपल आरएस मार्च महिन्यात येऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये ७६५ सीसी इनलाइन थ्री-सिलेंडर इंजिन दिले जाऊ शकते.

रॉयल एनफील्ड
मार्च महिन्यात भारतीय बाजारात रॉयल एन्फिल्ड Interceptor 650 आणि Continental GT 650 चे ब्लॅक एडिशन आणू शकते. अलीकडेच त्यांची ब्लॅक एडिशन जागतिक बाजारपेठेत सादर करण्यात आली. यामध्ये सर्व एलईडी हेडलॅम्प, नवीन रोटरी स्विचेस, यूएसबी चार्जिंग पोर्ट, ट्यूबलेस टायर्ससह अलॉय व्हील मिळू शकतात.

याशिवाय टीव्हीएसची आयक्यूब एसटी इलेक्ट्रिक स्कूटर देखील या महिन्यात लॉन्च होण्याची शक्यता आहे. कंपनीने ही स्कूटर जानेवारी २०२३ मध्ये आयोजित ऑटो एक्सपो दरम्यान सादर केली होती. या स्कुटरमध्ये ५.१ kWh ची बॅटरी बसवण्यात आली आहे. एका चार्जमध्ये ही स्कुटर १४० किमी.पर्यंत चालवता येते. आयक्यूब एसटी चार ते पाच तासांत पूर्ण चार्ज होऊ शकते. यात सात इंच टच पॅनल आहे, ज्यामध्ये टीपीएमएस, मीटर रेकॉर्ड, स्कूटरची माहिती, सेवेची माहिती उपलब्ध आहे. ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, पासवर्ड सिक्युरिटी, डॅमेज फोन नोटिफिकेशन, साइड स्टँड सिक्युरिटी अशी फीचर्स देखील यात ग्राहकाला मिळणार आहेत. टीव्हीएस आयक्यूब एसटीमध्ये ३१ लीटरची बूट स्पेस आहे ज्यात काही सामानासह पूर्ण आकाराचे हेल्मेट ठेवता येते.