मुसळधार पावसामुळे सुरत-भुसावळ रेल्वे मार्गावरील सेवा विस्कळीत
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जुलै २०२४ । राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नंदुरबारमधील नवापूर तालुक्यातही अतिवृष्टी झाली असून यामुळे सुरत- भुसावळ रेल्वे मार्गावर रेल्वे प्रशासनाचा बोजवरा उडाला आहे.
गुरुवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे चिंचपाडा रेल्वे स्थानक परिसरात रुळावर पाणी व मातीचा भराव वाहून आल्याने यात मालवाहू गाडी अडकल्याने सुरत- भुसावळ रेल्वे सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. रुळावर वाहून आलेला मातीचा भराव काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु करण्यात आले आहे.
चिंचपाडा रेल्वे स्थानकाजवळ महामार्गाच्या उड्डाणपुलाच्या पुलाखाली रेल्वे मार्गाला कोणतीही संरक्षण भिंत नसल्यामुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहून आले. तसेच पाण्यासोबत मातीचा ढिगारा देखील वाहून आला आहे. त्यामुळे (Railway) रेल्वे रुळावर पाणी मोठ्या प्रमाणात साचले त्यासोबत रेल्वे रुळावर माती आल्याने रेल्वे रुळ माती खाली गेल्याने रेल्वे मालगाडी रेल्वे रुळावर चिंचपाडा गावाजवळ अडकल्याने सुरत भुसावळ रेल्वे मार्गावर रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. परिणामी या मार्गावरील अनेक रेल्वे गाड्या या विविध स्टेशनवर थांबून आहेत. गेल्या तीन ते चार तासांपासून रेल्वेची वाहतूक झाली आहे बंद आहे.