खाजगी रुग्णालयांनी नाकारले…”शावैम” ने स्वीकारले
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२२ । अपघात झाल्याने स्टेअरिंगच पोटात घुसल्याने ट्रकचालकाचे आतडे फाटले…दुसऱ्या घटनेत झाडावरून थेट खाली दरीत कोसळल्याने प्लिहा फुटल्यामुळे तरुण गंभीर झाला… त्यांना अनेक खाजगी दवाखान्यांनी नाकारले, अखेर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणल्यावर वैद्यकीय पथकाने कौशल्य पणाला लावत दोघांनाही जीवदान देण्यात यश मिळविले. या वैद्यकीय पथकाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी कौतुक केले आहे.
उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथील ट्रकचालक रणवीर चौधरी (वय ३५) याचा अपघात झाल्याने ट्रकचे स्टिअरिंगच त्याच्या पोटात घुसले होते. त्यामुळे आतडे फाटून प्रचंड रक्तस्राव झाला होता. खाजगी दवाखान्यात नेल्यानंतर तेथे उपचार होणार नाहीत, म्हणून नाकारण्यात आले. अखेर लोकांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात २ मार्च रोजी रात्री उपचारासाठी दाखल केले. याठिकाणी त्याचे नातेवाईक आलेले नव्हते. त्याची परिस्थिती अत्यंत गंभीर झालेली होती.
त्याला तत्काळ शस्त्रक्रियेची आवश्यकता होती. शरीरातील रक्तपुरवठा बंद होत होता. रात्रीची वेळ आणि त्याच्या जीवाचा धोका पाहता वैद्यकीय अधिक्षक डॉ. विजय गायकवाड यांनी तत्काळ पालकत्व स्वीकारत त्याच्या शस्त्रक्रियेला परवानगी दिली. रात्री १ वाजता शल्यचिकित्सा विभागातील डॉ. रोहन पाटील, डॉ. उमेश जाधव, डॉ. स्नेहा वाडे, बधिरीकरण शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संदीप पटेल यांच्या पथकाने तत्काळ शस्त्रक्रिया केली. दुसऱ्या दिवशी ट्रकचालक रणवीर चौधरी याच्या प्रकृतीत सुधारणा सुरु झाली.
दुसऱ्या घटनेत, प्रवीण सुपडू दिंडे (वय ३५, रा. ढाना, ता. सोयगाव) हा तरुण झाडावरून खाली दरीत कोसळला होता. त्यामुळे त्याच्या शरीरातील प्लिहा फुटून त्याची परिस्थिती गंभीर झाली. तत्काळ जवळच्या खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे २८ फेब्रुवारी रोजी उपचारार्थ हलवण्यात आले. येथे शल्यचिकित्सा विभागाच्या डॉ. रोहन पाटील, डॉ. उमेश जाधव, डॉ. स्नेहा वाडे, बधिरीकरण शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संदीप पटेल यांनी तत्काळ शस्त्रक्रिया करून त्याचा जीव वाचविला.
दोघेही तरुणांचे प्राण वाचविल्याबद्दल शल्यचिकित्सा विभागाच्या युनिटचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उप अधिष्ठाता तथा शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. मारोती पोटे, डॉ.संगीता गावित, वैद्यकीय अधिक्षक डॉ. विजय गायकवाड यांनी अभिनंदन केले आहे. उपचार करण्याकामी कक्ष क्र. ७ येथील इन्चार्ज सिस्टर सुरेखा महाजन व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.