जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात एकीकडे अवैध धंदे, चोरी, खुनाच्या घटना वाढताना दिसत असून अशातच जळगाव जिल्ह्यात हादरवून टाकणाऱ्या सिरीयल किलरचा पर्दाफाश झाला आहे. पोलिसांनी सिरीयल खुनाचं प्रकरण उघडकीस आणले आहे. या सिरीयल किलरने दोन महिलांचा खून केले. तर तिसऱ्या महिलेवरही त्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या वेळेवर पळ काढण्यात यशस्वी ठरल्याने त्यांचा जीव वाचला.

अनिल गोविंदा संदानशिव असं या विकृत व्यक्तीचे नाव आहे. त्याने महिलांशी खोटं प्रेम प्रकट करत त्यांचा विश्वास मिळवला. नंतर शारीरिक संबंध प्रस्थापित करून त्यांची निर्घृण हत्या केली आणि मृतदेह जंगलात फेकल्याचं उघड झालं आहे.

शोभाबाई कोळी आणि वैजयंताबाई भोई या दोघींना त्याने फसवून प्रेमसंबंधात अडकवलं, आणि मग त्यांना जंगलात नेऊन निर्दयपणे दगडाने ठेचून हत्या केली. तिसरी महिला शाहनाज बी यांच्यावरही असाच कट रचला होता, पण त्या कशाबशा बचावल्या. प्रेमाच्या मुखवट्यामागे लपलेला हा विकृत खुनी अखेर पोलिसांच्या जाळ्यात आला आहे.
अनिल संदानशिव महिलांशी ओळख वाढवण्यासाठी बसमध्ये, गावात किंवा कामाच्या ठिकाणी गोड बोलायचा. एकदा विश्वास बसला की, तो त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करायचा आणि नंतर त्यांना सुमठाणे परिसरातील सामाजिक वनीकरण विभागाच्या जंगलात घेऊन जायचा. तिथे त्यांच्या डोक्यात दगड घालून क्रूर हत्या करायचा. हत्या करण्यापूर्वी तो त्यांच्याकडील सोनं, रोख रक्कम अशा मौल्यवान वस्तूंची लूट करायचा. अनिल संदानशिवच्या या थरारक आणि विकृत गुन्ह्यांमुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
दरम्यान, पोलिसांनी आरोपी अनिल सदाशिवला अटक केली असून, त्याची चौकशी सुरू आहे. ज्या जंगलात त्याने पीडितांचे मृतदेह फेकले होते तिथे पोलिसांचे पथक शोध मोहीम राबवत आहे. आरोपीने दोनपेक्षा जास्त महिलांची हत्या केली आहे का? याचाही तपास पोलिस करत आहेत. दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि कोणत्याही संशयास्पद हालचालीची तात्काळ तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.







