विहीर अनुदानासाठी मागितली लाच; जामनेर पंचायत समितीचा कंत्राटी तंत्रज्ञ एसीबीच्या जाळ्यात!

जून 22, 2026 7:39 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात लाचखोरीच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नसून याच दरम्यान, जामनेर पंचायत समितीतील एका विभागाच्या कंत्राटी वरिज्ञ तंज्ञत्राला ३० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. या कारवाईमुळे जामनेर पंचायत समितीसह जिल्ह्यातील लाचखोर वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

lach jpg webp

मिळालेल्या माहितीनुसार, सागर न्हावकर असे अटक करण्यात आलेल्या कंत्राटी वरिष्ठ तंत्रज्ञाचे नाव आहे. एका तक्रारदाराच्या विहिरीचे अनुदान मंजूर करण्यासाठी त्याने यापूर्वीच ३० हजार रुपयांची लाच स्वीकारली होती. मात्र, एवढ्यावरच न थांबता त्याने पुन्हा आणखी ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने तातडीने जळगाव एसीबीकडे (ACB) याविषयी रीतसर तक्रार नोंदवली.

तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने सोमवारी दुपारी जामनेर पंचायत समिती परिसरात सापळा रचला. मात्र, कारवाई दरम्यान आरोपी सागर न्हावकर याला काहीतरी संशय आल्याने त्याने ऐनवेळी लाचेची रक्कम स्वीकारण्यास नकार दिला. रक्कम हातात घेतली नसली, तरी पडताळणी दरम्यान त्याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले होते. लाच मागणीचा स्पष्ट अहवाल समोर आल्यानंतर एसीबीच्या पथकाने त्याला जागीच अटक केली.

जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात ही धडक कारवाई करण्यात आली. या यशस्वी सापळ्यात पोलीस निरीक्षक रेशमा अवतारे, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या कारवाईमुळे शासकीय कामांसाठी लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now