⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

जळगाव जिल्ह्यात 8 ऑक्टोबरपर्यंत 37 (1) (3) कलम जारी

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ सप्टेबर २०२१ । जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात 8 ऑक्टोंबर, 2021 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) व (3) जारी करण्यात आले आहे.

या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास संबंधित स्थानिक पोलीस स्टेशन यांच्या कार्यालयाची पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश शासकीय कार्यक्रम, प्रेतयात्रा यांना लागू राहणार नाही. शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यारे बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही. असे अपर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

दरम्यान, जिल्ह्यात गुन्हेगारीला आळा घालून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात कारवाया करण्यात येणार असल्याचे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. प्रत्येक उपविभागात सहाय्यक अधीक्षकांना गुन्हेगारांची पार्श्वभूमीवर पाहून २ गुन्हेगारांना मोक्का आणि २ गुन्हेगारांवर एमपीडीए लावण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रेरणा हॉलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेला पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा, अर्चित चांडक यांची उपस्थिती होती.