जळगाव लाईव्ह न्यूज । सैन्यासाठी लागणारे शस्त्रास्त्र व दारूगोळ्याची निर्मिती जळगाव जिल्ह्यातील भुसावळ वरणगाव येथील ऑर्डनन्स फॅक्टरी अर्थात आयुध निर्माणीतून केली जाते. याची माहिती अनेकांना आहेच. मात्र दुसर्या महायुध्दाच्यावेळी जळगाव जिल्ह्यात ३४ गॅलन बॅरल ड्रम युध्द इंधन तयार झाले होते, असे म्हटल्यास त्यावर चटकन विश्वास बसणार नाही कारण दुसरे महायुध्द जेंव्हा सुरु झाले तेंव्हा मुळातच भुसावळ व वरणगाव या दोन्ही आयुध निर्माणी नव्हत्याच! मग बिटिशांसाठी जळगाव जिल्ह्यात ५ गॅलन ड्रम युध्द इंधन तयार झालेच कसे? असा प्रश्न पडणे स्वाभाविकच आहे.
दुसरे महायुध्द आणि भारत (Second World War and India)
दुसर्या महायुध्दात भारताचा महत्वाचा सहभाग होता. दि.१ सप्टेंबर १९३९ रोजी हिटलरने पोलंडवर हल्ला करून जगाला दुसर्या महायुद्धाच्या संकटात लोटले. दि.३ सप्टेंबरला इंग्लंडने हिटलरविरुद्ध युद्धात उडी घेतली आणि ती घेताना आपल्यासोबत भारताचा सहभाग गृहीत धरून त्यालाही युद्धात ओढले. शासन दप्तरी असलेल्या नोंदींनुसार, १९३९ साली दुसरे महायुद्ध सुरू झाले तेंव्हा त्यात ब्रिटीश भारताचे सुमारे दोन लाख सैनिक होते. १९४५ साली हे युद्ध संपले तेंव्हा भारतीय सैनिकांची संख्या तब्बल ३० लाखांवर पोहोचली होती. ब्रिटीश भारतीय सैनिकांनी युरोप, आफ्रिका आणि पूर्व आशियात अनेक मोहिमांमध्ये भाग घेतला, आणि ब्रिटिशांना विजय मिळवून दिला. ब्रिटीश भारताच्या सुमारे ४००० सैनिकांना त्यांच्या पराक्रमासाठी शौर्य पदके मिळाली. त्यातील ३१ सैनिकांना व्हिक्टोरिया क्रॉस हे सर्वोच्च शौर्य पदक मिळाले आहे.
ब्रिटीशांच्या राजवटीतच भारतीय आयुध निर्माणी स्थापन झाल्या. ईस्ट इंडिया कंपनीने भारतातील राजकीय सामर्थ्य वाढवण्यासाठी लष्करी सामर्थ्य वाढविण्यासाठी १७७५ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने फोर्ट विल्यम, कलकत्ता येथे ऑर्डनन्स सर्कलच्या पायाभरणी केली. आजच्या स्थिती आयुध निर्माणी मंडळामध्ये भारतभर पसरलेल्या ४१ आयुध निर्माणी, ४ प्रादेशिक सुरक्षा नियंत्रक, ३ प्रादेशिक विपणन केंद्रे आणि ९ प्रशिक्षण संस्थांचा समावेश आहे. हे सशस्त्र दलांचे बल आणि संरक्षणाचे चौथे शस्त्र मानले जाते. बोर्डाचे व्यवस्थापन संरक्षण मंत्रालयाकडून केले जाते. भारतीय आयुध निर्माणी त्यांची उत्पादने भारताच्या तीनही सशस्त्र दलांना, भारतीय हवाई दल, भारतीय लष्कर आणि भारतीय नौदलाला पुरवतात. शस्त्रांचे भाग, पॅराशूट, रसायने आणि स्फोटके, शस्त्रे आणि दारूगोळा, कपडे आणि चामड्याच्या वस्तू जगातील सुमारे ३० देशांमध्ये निर्यात केल्या जातात. देशभरात पसरलेल्या आयुध कारखान्यांमध्ये विविध प्रकारची शस्त्रे आणि युद्धसामुग्री बनवली जाते. आयुध निर्माणीमुळेच भारत दिवसेंदिवस मजबूत होत आहेत.
देशातील ४१ आयुध निर्माणींपैकी १० महाराष्ट्रात तर २ जळगाव जिल्ह्यात आहेत. जळगाव जिल्ह्यात सर्वप्रथम १९४९ मध्ये भुसावळ आयुध निर्माणीची स्थापना झाली तर १९६४ मध्ये वरणगाव आयुध निर्माणीची सुरुवात झाली. यापैकी भुसावळ आयुध निर्माणीचा संबंध दुसर्या महायुध्दाशी येतो. आता तुम्ही म्हणाल की, मुळात भुसावळ आयुध निर्माणीची स्थापना १९४९ मध्ये झाली आहे आणि दुसरे महायुध्द १९४५ ला संपले आहे. मात्र यामागे मोठी रंजक कहाणी आहे. द बर्मा ऑइल कंपनी लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे, बर्मा कॅस्ट्रॉल पीएलसी हे युनायटेड किंगडममधील सर्वात जुने तेल उद्योग आहे. याच बर्मा शेल कंपनीने दुसर्या महायुध्दावेळी भुसावळला ५ गॅलन ड्रम युध्द इंधनाच्या निर्मितीसाठी प्लांट सुरु केला होता. युध्दादरम्यान, या प्रकल्पावर लष्करी अधिकार्यांनी ताबा मिळविला आणि जवळपासच्या ३४ जागांना इंधन पुरविण्यासाठी ३४ गॅलन बॅरेल उत्पादन केले. स्वातंत्र्यानंतर हा कारखाना संरक्षण मंत्रालयाकडे सुपूर्त करण्यात आला, असा उल्लेख जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रकाशित केलेल्या कॉफीटेबल बुकमध्येही करण्यात आला आहे. सध्यस्थितीत भुसावळ आयुध निर्माणीतून १६ प्रकारची संरक्षण उत्पादने तयार केली जातात. यात आधुनिक हत्यार असलेल्या पिनाका रॉकेटच्या पॉडचा समावेश आहे.