⁠ 
शनिवार, एप्रिल 13, 2024

पावसाचे जोरदार कमबॅक; गिरणा नदीला हंगामातील मोठा पूर

जळगाव लाईव्ह न्यूज | ९ सप्टेंबर २०२३ | गेल्या महिनाभरापासून दडी मारुन बसलेल्या पावसाने राज्यात जोरदार कमबॅक केले आहे. निम्मा जळगाव जिल्हा ज्या गिरणा धरणावर अवलंबून आहे. त्या गिरणा धरणातही पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. शनिवार सकाळपर्यंत गिरणा धरणात ४४ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात सर्वत्र पावसाच्या आगमन झाल्याने नागरिक सुखावले आहेत. मालेगाव परिसरात पाऊस सुरू असल्याने गिरणा नदीला हंगामातील मोठा पूर आला आहे.

चणकापूर, पुनंद आणि हरणबारी या तिन्ही मोठ्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने गिरणा नदीला यंदाच्या हंगामातील मोठा पूर आला आहे. या पूर पाण्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून मोसम गिरणा नदीला आलेल्या पुरामुळे गिरणा धरणाच्या पाणीसाठ्यातही वाढ झाल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

गिरणा नदीला आलेल्या पुरामुळे या नदीवरील अनेक लहान-मोठे पूल पाण्यात गेले आहेत. हा पूर पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. चणकापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. धरणाच्या ७ दरवाजांमधून ३३ हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे गिरणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. गिरणा नदीवरील छोटे पूल पाण्याखाली गेले आहेत. पावसाचा जोर सुरू राहिल्यास पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे. तसे, पाटबंधारे विभागाने सांगितले आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून पावसाची जोरदार प्रतीक्षा होती. पेरणी झालेल्या पिके वाया जाण्याची भीती होती. मात्र, आता जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवस पाऊस सांगितला असल्याने परिसरातील धरणसाठ्यात लक्षणीय वाढ होण्याची चिन्हे आहेत.