जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जानेवारी २०२२ । मूळजी जेठा महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची ओळख’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून मू.जे.महाविद्यालयातील इतिहास विभागाचे माजी विभाग प्रमुख प्रा.के.के.वळवी उपस्थित होते.
दरम्यान, सर्व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी व श्रोत्यांना संबोधित करतांना ते म्हणाले, “ देशाच्या सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात सावित्रीबाई फुले यांचे त्या काळातील योगदान हे त्यानंतरच्या सामाजिक परिवर्तनाचा केंद्रबिंदू ठरले. अठराव्या शतकात मुलींना लिहण्या, वाचण्याचे स्वातंत्र्य नव्हते व समाजात कर्मठ रूढी परंपरेचा पगडा होता. अशा विपरीत सामाजिक परिस्थितीत सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार घेऊन शाळा सुरु केली. सावित्रीबाई फुले यांनी महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशातील मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली करून देतानाच समाजातील अनिष्ट कुप्रथाविरोधात त्यांनी स्वतंत्र व ठाम भूमिका घेऊन चळवळी व आंदोलने उभारून त्याचे नेतृत्व केले. पुढे बोलतांना प्रा. के.के. वळवी म्हणाले की, सावित्रीबाई फुले आधीपासूनच धीट व निडर स्वभावाच्या होत्या. त्यांच्या मनात बालपणापासूनच समाजातील अनिष्ट प्रथाच्या बाबतीत प्रचंड चीड होती. देशातील शूद्रातिशूद्र यांच्या समोर असलेले गंभीर सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी सावित्रीबाई फुले अखेरपर्यंत कार्यरत राहिल्यात. विधवा विवाह, अस्पृश्यता निर्मूलन, स्त्री मुक्ती, व दलित स्त्रियांना शिक्षित करणे हे ध्येय घेऊन जगल्या. सावित्रीबाई फुले यांनी प्रत्यक्ष आयुष्यात स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचा पुरस्कार करत व आपल्या कृतीतून जगासमोर आदर्श ठेवला. आताच्या पिढीने त्यांनी केलेल्या कार्याचा अभ्यास करावा व त्यांचा एखादा विचार तरी प्रत्यक्ष कृतीत उतरवविण्याचा प्रयत्न करावा. तेव्हाच खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनाचे सार्थक होईल.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान मूजेच्या सामाजिक शास्त्रे प्रशाळेचे संचालक प्रा. देवेंद्र इंगळे यांनी भूषवले. आपल्या अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले, ‘सावित्रीबाई फुले यांचे विचार आजच्या पिढीने गंभीरतेने समजून घेण्याची आवश्यकता आहे. त्यांचा एक विचार जरी व्यवस्थित समजून घेतला आणि त्याला आचरणात आणण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा निश्चितच फायदा होईल. सभोवतालचे बदलते सामाजिक समीकरणे व भरकटत जाणारा युवा यामुळे सामाजिक गुंतागुंत निर्माण झाली आहे. त्यामुळे आज सावित्रीबाई फुले यांनी सांगितलेले विचार स्वातंत्र्य, समता व बंधुता याची आवश्यकता आहे. आजच्या नवतरुणांनी सावित्रीबाई फुले यांनी सांगितलेल्या विचाराचे वाहक होऊन समाजातील अनिष्ट विचारांना नाकारून समाज व देश निर्मितीत योगदान द्यावे असे ते उपस्थित श्रोत्यांना म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.दिलवरसिंग वसावे यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे संचालन व आभार रा.से.यो.प्रथम वर्षाचा विद्यार्थी संकेत चौधरी यांनी केले. या कार्यक्रमाला कला शाखा संचालक डॉ. बी.एन. केसुर, रासेयोचे सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ. नम्रता महाजन, डॉ. विशाल देशमुख, डॉ.योगेश महाले, डॉ. चंद्रमणी लभाणे, डॉ. जयेश पाडवी, डॉ. योगेश बोरसे. प्रा. विजय लोहार, डॉ. अनिल क्षीरसागर, डॉ. एन. एस. बोरसे, डॉ. नसिकेत सूर्यवंशी, प्रा.गोविंद पवार, डॉ. आर. बी. गायकवाड, डॉ. उज्वला नेहते, प्रा. राजीव पवार, प्रा. गोपीचंद धनगर, प्रा. निलेश चौधरी, इत्यादी प्राध्यापक आणि सुमारे ४० विद्यार्थी उपस्थित होते.
हे देखील वाचा :
- विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! १०वी आणि १२वी परीक्षेच्या तारखा जाहीर
- सरकारी नोकर भरतीतील शिंदे-फडणवीस सरकारच्या गेमचेंजर पॉलिसीमुळे पात्र युवकांना संधी
- 10वी आणि 12वी परीक्षेच्या फीमध्ये वाढ; आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार?
- लाल किल्ल्यावरून मेडीकल शिक्षणासंदर्भात पंतप्रधान मोदींकडून मोठी घोषणा
- विनापरीक्षा नोकरीची मोठी संधी ; 3256 जागांवर निघाली भरती, पगारही भरघोष मिळेल..