खरीप हंगामासाठी आवश्यक खताचा साठा करून ठेवा ; कृषी विभागाचे आवाहन
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२२ । रशिया व युक्रेन यांच्यातील सुरु असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय खत बाजारात देखील खतांची टंचाई होण्याची शक्यता असून खतांच्या किमतीत वाढही होण्याची शक्यता आहे. आपला देश परदेशातून खते आयात करणारा देश असून युद्धजन्य परिस्थितीचा फटका बसण्याची शक्यता आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी सध्या बाजारपेठेत मुबलक प्रमाणात खत साठा उपलब्ध असून आमागी खरीप हंगामासाठी आवश्यक खताचा साठा करून ठेवावा, असे आवाहन कृृषी विभागाने केले आहे. तालुक्यात बुधवारी युरिया २५०५ मेट्रिक टन, एसएसपी ९६ मेट्रिक टन, पोटॅश २१७ मेट्रिक टन, डीएपी ९६ मेट्रिक टन आणि कंपोस्ट २५ मेट्रिक टन असा पुरेसा साठा उपलब्ध आहे.
रशिया व युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर ऐन खरीप हंगामात खतांचा तुटवडा भासण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी अावश्यक व शक्य असेल तेवढी आवश्यक खते खरेदी करून ठेवा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी चंद्रशेखर साठे यांनी केले आहे.