⁠ 
मंगळवार, मे 21, 2024

सरपंच, ग्रामसेवकांनी आपल्या क्षेत्रातील पाण्याशी संबंधित समस्या सोडवाव्यात : आ. शिरीष चौधरी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | २४ ऑक्टोबर २०२१ | उन्हाळयात पाणी टंचाई भासू नये या दृष्टीकोणातुन आगामी काळात ग्रामपंचायतीतील सरपंच, सदस्यांसह ग्रामसेवकांनी दक्ष राहून आपल्या क्षेत्रातील पेयजल समस्या व अडचणींचे सोडविण्याचे काम करावे, असे आवाहन आमदार शिरीष चौधरी यांनी केले.

रावेर, यावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरीष चौधरी व चोपडयाच्या आमदार लता सोनवणे यांच्या उपस्थितीत यावल पंचायत समितीच्या सभागृहात पाणीटंचाई संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी यावल पंचायत समितीच्या सभापती पल्लवी चौधरी, उपसभापती योगेश भंगाळे, जिल्हा परिषदेचे गटनेते प्रभाकर सोनवणे, पंचायत समितीचे काँग्रेसचे गटनेता तथा संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष शेखर पाटील, भाजपचे पंचायत समितीचे गटनेता दीपक पाटील, वढोदे गावाचे सरपंच संदीप सोनवणे, निवासी नायब तहसीलदार आर.के. पवार, प्रभारी गटविकास अधिकारी विलास भटकर, ग्रामविस्तार अधिकारी किशोर सपकाळे आदी उपस्थित होते.

बैठकीत यावल तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतींकडून आगामी काळातील पाणीटंचाई संदर्भात आढावा घेण्यात आला. आढावा बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांसंदर्भात प्रत्यक्ष कृती काय झाली याबाबत महिनाभरानंतर घेण्यात येणाऱ्या आढावा बैठकीत कृती आराखडा सादर करण्यात यावा. जेणेकरून घेण्यात आलेल्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली अथवा नाही या विषयी आपणास माहिती मिळेल, अशी सूचनाही आमदार शिरीष चौधरी यांनी केली.

पेयजल योजनेच्या कामांना मुदतवाढ 
मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या कामांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींनी मार्च २०२२ पर्यंत या योजनेतील रखडलेली कामे त्वरित पूर्ण करून घ्यावीत, अशी सूचना अधिकाऱ्यांनी केली. यावेळी वड्री, आडगाव येथील ग्रामसेवक व सरपंच आढावा बैठकीस उपस्थित नसल्यामुळे संबंधित ग्रामसेवकांवर कारवाई करावी, अशी सूचना जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणे यांनी केली.