Chalisgaon : मागणी १० लाखाची, २ लाखांची लाच स्वीकारताना सरपंचासह तिघे जाळ्यात
जळगाव लाईव्ह न्यूज । २७ डिसेंबर २०२४ । जळगाव जिल्ह्यातून आठवड्यातून एक तरी लाचेची बातमी समोर येत असून याच दरम्यान चाळीसगाव तालुक्यात लाचखोरीचा प्रकार समोर आला आहे. शेतजमिनीबाबत कोर्ट कचेऱ्यांचा त्रास होऊ द्यायचा नसेल तर १० लाख रुपये द्यावे लागतील अशी लाचेची मागणी केल्याप्रकरणी व त्यातील तडजोडीअंति ५ लाखांपैकी २ लाखांचा पहिला हप्ता लाच म्हणून स्वीकारल्याप्रकरणी खाजगी इसमाला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. त्याच्यासह चाळीसगाव तालुक्यातील बहाळ रथाचे या गावचे सरपंच व लिपीकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बहाळ येथील सरपंच राजेंद्र महादू मोरे याच्यासह ग्रामपंचायत लिपिक शांताराम तुकाराम बोरसे व खाजगी पंटर सुरेश सोनू ठेंगे अशी तिघांची नावे आहेत. बहाळ (ता. चाळीसगाव) येथील ७० वर्षीय तक्रारदार यांची मौजे बहाळ रथाचे येथे मालकी कब्जे वहिवाटीतील अशी शेत जमीन असून या शेतजमिनीवर ग्रामपंचायत बहाळ हे त्यांचा हक्क दाखवून ही जागा परस्पर इतर व्यक्तीस भाडेतत्त्वावर देण्याची शक्यता असल्याने तक्रारदार यांनी ग्रामपंचायती विरुद्ध न्यायालयातून कायमस्वरूपी मनाई हुकूम आणला होता.
त्यानंतर सरपंच राजेंद्र मोरे यांनी तक्रारदार यांना भेटून त्यांच्या शेतजमिनीबाबत ग्रामपंचायतीकडून कोर्ट कचेऱ्यांचा त्रास न होऊ देण्याच्या मोबदल्यात दीड हजार चौरस फुटाचा प्लॉट खरेदी करून द्यावा लागेल, असे सांगितले. मात्र तक्रारदार यांनी प्लॉट स्वरूपात काहीएक देऊ नसल्याचे सांगितल्याने सरपंच राजेंद्र मोरे यांनी १० लाख रूपये लाचेची मागणी केली. अन्यथा ग्रामपंचायतीकडून तुला कोर्ट कचेरीचा त्रास सहन करावा लागेल, असे सांगितले. त्यामुळे तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे યુક્ત कार्यालयात समक्ष येवून तक्रार दिली. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक सचिन साळुंखे, पोलिस निरीक्षक पंकज शिंदे, रूपाली खांडवी यांच्या पथकाने केली.
बहाळला घरातच केली अटक
सरपंच राजेंद्र मोरे व लिपिक शांताराम बोरसे यांनी तक्रारदार यांना भेटून लाचेची २६ डिसेंबर रोजी बहाळ येथे तक्रारदार राहते घरी खासगी इसम सुरेश ठेंगे याच्याकडे देण्यास सांगितले होते. त्यानूसार पथकाने तक्रारदाराच्या बहाळ येथील राहत्या घरी सापळा लावला. तेथ रक्कम घेताना ठेंगेला रंगेहात पकडले.