जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२२ । कोरोना संसर्ग कमी झाल्याने तब्बल दोन वर्षांनंतर महाराष्ट्र कोरोनमुक्त झाला आहे. यामुळे धार्मिक कार्यक्रमासह इतर कार्यक्रम धुमधडाक्यात होत आहे. अशातच दोन वर्षानंतर आषाढी पायी वारी (Ashadhi Pai Wari) होणार आहे. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण असून, वारकरी तयारीला लागले आहे. येत्या 21 जूनला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. पंढरपूरमध्ये एकादशीच्या आदल्या दिवशी झालेल्या बैठकीत पायी वारीचे वेळापत्रक सादर करण्यात आले आहे.
आषाढी पायी पालखी सोहळ्याचा कार्यक्रम
मंगळवार दिनांक 21 जून रोजी सायंकाळी 4 वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदी येथून प्रस्थान ठेवणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. बुधवार दिनांक 22 आणि गुरुवार दिनांक 23 रोजी पुणे, शुक्रवार दिनांक 24 आणि शनिवार दिनांक 25 रोजी सासवड, रविवार दिनांक 26 रोजी जेजुरी, सोमवार दिनांक 27 रोजी वाल्हे, मंगळवार दिनांक 28 आणि बुधवार दिनांक 29 रोजी लोणंद, गुरुवार दिनांक 30 रोजी तरडगांव, शुक्रवार दिनांक 1 आणि शनिवार दिनांक 2 जुलै रोजी फलटण, रविवार दिनांक 3 रोजी बरड, सोमवार दिनांक 4 रोजी नातेपुते, मंगळवार दिनांक 5 रोजी माळशिरस, बुधवार दिनांक 6 रोजी वेळापूर, गुरुवार दिनांक 7 रोजी भंडीशेगाव, शुक्रवार दिनांक 8 रोजी वाखरी तर शनिवार दिनांक 9 रोजी श्री क्षेत्र पंढरपूर मुक्कामी सोहळा पोहोचेल. रविवार दिनांक 10 जुलै रोजी आषाढी एकादशीचा महासोहळा होणार आहे. पालखी सोहळ्यात चांदोबाचा लिंब, बाजीराव विहीर आणि इसबावी येथे उभे रिंगण तर पुरंदावडे (सदशिवनगर), पानीव पाटी, ठाकुरबुवा आणि बाजीराव विहीर येथे अश्वांचे गोल रिंगण होणार आहे.