जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२२ । पारोळा शहराचे भूषण असलेला भुईकोट किल्ला खूपच दयनीय स्थितीत पोहचला होता. अखेर आज भुईकोट किल्ला परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या निमित्ताने दौऱ्यावर असलेले जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी कचरा उचलत सहभाग घेतला. शिवाय अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या हद्दवाढीच्या प्रश्नांबाबत आज जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधला. शहराच्या हद्दवाढीबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सकारात्मक भूमिका घेत पालिका प्रशासनाला याबाबत अंमलबजावणीसाठी सूचना दिल्या आहेत.
स्वच्छता मोहिमेचे कौतुक
श्रीराम नवमीनिमित्त राजा शिवछत्रपती परिवार जळगाव, धुळे, अहमदनगर येथील मावळे यांच्यासह महसूल, पोलीस, पालिका, विद्यार्थी व लोकसहभागातून येथील पुरातन किल्ल्याची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छता मोहिमेत राजा शिवछत्रपती परिवार जळगाव, धुळे, किसान महाविद्यालय पारोळा, राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय पारोळा, कला वाणिज्य महाविद्याय धरणगाव येथील विद्यार्थी व प्राध्यापक यांच्यासह तहसीलदार अनिल गवांदे, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, मुख्यधिकारी ज्योती भगत, माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे आदींसह महसूल पोलीस कर्मचारी व पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी स्वच्छता मोहिमेचे कौतुक व अभिनंदन केले.
तसेच जिल्हाधिकारी राऊत यांनी पुरातन किल्ल्याची सर्वत्र पाहणी करीत येथील कोरीव कामाचे कौतुक केले. तसेच किल्ल्यास सुशोभित करण्यासाठी प्रशासनाने योग्य तो पाठपुरावा करावा अशा सूचना केल्या. यावेळी किल्ला परिसरातील स्वतः जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कचरा उचलून स्वच्छता मोहिमेच्या या यज्ञ यागात सहभाग घेतला. राजा शिवछत्रपती परिवार तसेच महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तब्बल आठ ते दहा तास श्रमदान करून किल्ल्या परिसराची साफसफाई केली. एवढेच नव्हे तर तटबंदीच्या आजुबाजुतील झाडेझुडपे तोडून त्यांना एका ठिकाणी संकलित केले. श्रमदानात तब्बल चाळीस ते पन्नास ट्रॅक्टर कचरा संकलित करण्यात आला.
शपथ मोहीम
भुईकोट किल्ल्याच्या स्वच्छते दरम्यान माझी वसुंधरा अभियानांतर्गत आपला परिसर स्वच्छ कसा राहील. ओला व सुका कचरा यांची योग्य विल्हेवाट कशी लागेल. तसेच पर्यावरण संतुलन कसे राखले जाईल. यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असून सर्वांनी या अभियानात सहभागी व गुंते अभियान यशस्वी करावे यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी प्रत्यक्षपणे माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत प्रशासनासह विद्यार्थी व लोकांकडून शपथ घेत या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.