⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

संघपाल तायडे यांनी विद्यार्थ्यांसमोर उलगडला “पोलीस ते गायक होण्यापर्यंतचा जीवनप्रवास

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ एप्रिल २०२२ । पोलीस’ हा शब्द जरी उच्चारला तरी दरारा, धाक, कडक शिस्त असलेल्या व्यक्तीची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. परंतु, जळगावात याच वर्दीतली गोड आवाजाची एक दर्दी व्यक्ती आहे. ती म्हणजे जळगाव जिल्हा पोलीस दलातील पोलीस कर्मचारी संघपाल तायडे, शहरातील रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयातील ड्रामा क्लबच्या वतीने पोलीस कर्मचारी संघपाल तायडे यांना नुकतेच आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करतांना श्री. तायडे यांनी पोलीस ते गायक होण्यापर्यंतचा आपला जीवनप्रवास विध्यार्थ्यांसमोर उलगडला.

संघपाल यांनी सांगितले की, २००७ मध्ये त्यांची मुंबई पोलीस दलात नियुक्ती झाली होती. काही वर्षे मुंबईत नोकरी केल्यानंतर बदली होऊन ते जळगावात आले. अभिनयाची आवड असल्याने त्यांनी ‘दुष्काळ’ नावाच्या एका शॉर्टफिल्ममध्ये शेतकऱ्याची भूमिका केली होती. याच शॉर्टफिल्ममध्ये त्यांनी आपल्या गोड आवाजात ‘तू ये रे पावसा…’ हे गीत गायले होते. 3 वर्षांपूर्वी शिर्डी येथे बंदोबस्ताला असताना सकाळी सकाळी ते हेच गीत गुणगुणत होते. गीत अतिशय सुंदर असल्याने राजेश पाटील नामक त्यांच्या सहकारी मित्राने त्यांच्या वर्दीतील गायनाचा व्हिडिओ करून तो फेसबुकवर शेअर केला.

अवघ्या 24 तासातच त्या व्हिडिओला 8 लाखांहून अधिक लाईक आणि व्ह्यूज मिळाले. याची दखल प्रसारमाध्यमांनी घेतल्याने संघपाल तायडे रात्रीतून स्टार बनलेत. पुढे त्यांनी गायलेले ‘सैराट’ चित्रपटातील ‘याडं लागलं… याडं लागलंय रं…’ हे गीतही सोशल मीडियावर असेच व्हायरल झाले होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या संघपाल तायडेंच्या गीतांची दखल थेट हिंदी, मराठी चित्रपट निर्मिती क्षेत्रातील दिग्दर्शकांनी घेऊन त्यांना पार्श्वगायनाच्या संधीही दिल्या आहेत. याखेरीज त्यांनी ‘झी टीव्ही’, ‘झी मराठी’, ‘स्टार प्लस’, ‘कलर्स’, अशा हिंदी व मराठी वाहिन्यांवरील अनेक रियालिटी शो गाजवले आहेत. झी टीव्हीवरील सारेगमप या रियालिटी शोमध्ये ते टॉप 20 मध्ये आले होते. प्रसिद्ध मराठी चित्रपट ‘आटपाडी नाईट्स’ चित्रपटात त्यांनी पार्श्वगायन केले आहे. गीत गायनाच्या माध्यमातून पोलीस दलाची प्रतिमा जनमानसात उंचावण्याचा आपला मानस असल्याची भावना त्यांनी विद्यार्थ्यांशी बोलताना व्यक्त केली. तसेच त्यांनी कोरोनाकाळात उदभवलेल्या युद्धजन्य परिस्थितीत आपले कर्तव्य सांभाळत असताना स्वरचित गीतगायनातून जनजागृतीचे कार्यहि केले होते.

यावेळी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे नितीन माळी, पंकज कासार उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे नियोजन ड्रामा क्लबचे समन्वयक बापूसाहेब पाटील यांनी केले होते व या कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रीतमजी रायसोनी व संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी कौतुक केले.