जळगाव लाईव्ह न्यूज । खासगी प्रवाशांच्या सुरक्षिततेची पर्वा न करता त्यांना वाऱ्यावर सोडण्याचा संतापजनक प्रकार संगीतम ट्रॅव्हल्सने केला आहे. पुण्याहून जळगावसाठी निघालेल्या संगीतम ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये शिरुरजवळ बिघाड झाल्यानंतर दुसरी बस न मागविल्याने जवळपास ३५ प्रवाशांना रस्त्यावरच रात्र काढावी लागली. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर दुसऱ्या दोन वाहनांनी प्रवासी जळगावात पोहोचले. आणि संगीतम ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात जाऊन संताप व्यक्त केला.

प्रवाशांच्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री पुण्याहून जळगाव दिशेने निघालेली ही बस (एमएच १९ सीएक्स.८८८४) मध्यरात्री शिरूर बायपास रस्त्यावर अचानक थांबली. पुण्यापासून सुमारे ७० ते ८० किमी ही बस होती; परंतु बसचा डिझेल पाइप खराब झाल्याने तासन्तास बस रस्त्याच्या कडेला उभी राहिली. बस का निघत नाही? असे प्रवाशांनी विचारल्यावर त्यांना बस खराब झाल्याचे सांगण्यात आले. प्रवाशांनी पर्यायी व्यवस्थेची मागणी केली. मात्र चालक व मालकाकडून उत्तर न मिळाल्याने प्रवासी प्रचंड संतापलेले होते.

बस नादुरुस्त झाली, तरी ‘संगीतम’ ने दुसऱ्या बसची व्यवस्था केली नाही. याविषयी प्रवाशांनी वारंवार विचारणा केली. मात्र, काही उपयोग झाला नाही. त्यामुळे मध्यरात्री एक वाजल्यापासून पहाटे पाच वाजेपर्यंत प्रवासी थांबून होते. कोणताही पर्याय न दिसल्याने संतप्त प्रवाशांनी थेट पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ दोन टेम्पो ट्रॅव्हलर्स मागवल्या. यानंतर शुक्रवारी पहाटे ५ वाजता दोन्ही टेम्पो ट्रॅव्हलर्स प्रवाशांना घेऊन जळगावच्या दिशेने मार्गस्थ झाले.
जळगावात दुपारी १२ वाजता टेम्पो ट्रॅव्हलर्सने आलेले सर्व प्रवासी थेट स्टेडियम चौकातील संगीतम ट्रॅव्हल्सच्या कार्यालयावर पोहोचले. एका सीटसाठी एक हजार ४०० रुपये मोजूनही दुसऱ्या बसची व्यवस्था का केली नाही, असा जाब विचारत भाड्याची रक्कम परत करण्याची मागणी केली. तेथील कर्मचाऱ्यांनी सुरुवातीस पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. मात्र प्रवाशांनी संताप व्यक्त केल्यानंतर बऱ्याच वेळाने संगीतम ट्रॅव्हल्याने भाडे परत करण्याची ग्वाही दिली.






