जळगाव लाईव्ह न्यूज । खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे…अशा या गीताने संपूर्ण जगाला सर्वधर्म समभावाची शिकवण देणारे पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच साने गुरुजी. (Panduranj Sadashiv Sane – Sane Guruji) साने गुरुजींचे नाव घेतल्यावर श्यामची आई या सुप्रसिद्ध कादंबरीची आठवण झाल्याशिवाय राहणारच नाही. साने गुरुजी व जळगाव जिल्ह्याचे (Sane Guruji Jalgaon Connection) विशेष नाते आहे. कारण हिच त्यांची कर्मभूमी म्हणून ओळखली जाते. खानदेश एज्युकेशन सोसायटीच्या प्रताप हायस्कूलमध्ये (Pratap Highschool Jalgaon) १७ जून १९२४ ला शिक्षक म्हणून साने गुरुजी रुजू झाले. त्यानंतर १९४२ पर्यंत म्हणजे तब्बल १८ वर्षं गुरुजी अमळनेरमध्ये होते.
१९३० मध्ये महात्मा गांधींनी दांडी मार्च सुरू केला तेव्हा साने गुरुजींनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सामील होण्यासाठी शालेय नोकरीचा राजीनामा दिला होता. नागरी अवज्ञा चळवळीत काम केल्याबद्दल त्यांना ब्रिटिश अधिकार्यानी धुळे कारागृहात पंधरा महिन्यांहून अधिक काळ तुरुंगात ठेवण्यात आले. १९३० ते १९४७ या कालावधीत साने गुरुजी वेगवेगळ्या आंदोलनात सहभागी झाले आणि आठ वेळा त्यांना अटक करण्यात आली आणि धुळे, त्रिचिनापल्ली, नाशिक, येरवडा आणि जळगाव येथील तुरूंगात एकूण सहा वर्षे सात महिने वेगवेगळ्या तुरूंगात ठेवण्यात आले. धुळे जेलमध्ये असतांना ते कैद्यांचा अभ्यासवर्ग घेत असत. त्यामुळेच त्यांचे सहकारी त्यांना ‘गुरुजी’ असे म्हणू लागले. नाशिकच्या तुरुंगात असतांना ते रोज रात्री कैद्यांना त्यांच्या व आईच्या आठवणी सांगत असत त्यामधुनच ‘श्यामची आई’ हे अविस्मरणीय पुस्तक तयार झाले.
जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशन यशस्वी होण्यासाठी त्यांनी १९३६ मध्ये काम केले. या अधिवेशनात साने गुरुजींनी भाषण केले त्यामुळे हजारो तरुण त्यांचे स्वयंसेवक बनण्यासाठी तयार झाले होते. १९४२ चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार त्यांनी केला. तसेच फैजपूर येथील अधिवेशनात महात्मा गांधींच्या विचारसरणीचा अनुसरून त्यांनी ‘मैला वाहने’ व ‘ग्राम स्वच्छतेची’ इतर कामे ही हाती घेतली. साने गुरुजी यांच्या ‘पत्री’ या पहिल्या काव्यसंग्रहातून देशभक्तिपर कविता प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यातील ‘बलसागर भारत होवो’ सारख्या कवितांचा नागरिकांवरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन, ब्रिटिश सरकारने त्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या होत्या. त्याचाही थेट संबंध जळगाव जिल्ह्याशीच येतो.
प्रताप हायस्कुलच्या ज्या विद्यार्थी वसतिगृहाचे अधीक्षक म्हणून ते ज्या खोलीत राहात, ती खोली आजही जतन करण्यात आली आहे. ‘विद्यार्थी’ हे मासिक आणि ‘काँग्रेस’ हे साप्ताहिक गुरुजींनी इथेच सुरू केले. याशिवाय रोज ते स्वतःच्या हस्ताक्षरांत ‘छात्रालय’ दैनिकही प्रकाशित करत असत. अमळनेरमधूनच १७ मे १९३० रोजी ब्रिटिशांनी साने गुरुजींना अटक केली होती. १८७२ मध्ये ब्रिटिशांच्या काळात स्थापन झालेल्या व्हिक्टोरिया नेटिव्ह जनरल लायब्ररीचे १९७२ मध्ये ‘साने गुरुजी ग्रंथालय’ असे नामकरण करून अमळेनरकरांनी त्यांची स्मृती कायमस्वरूपी जतन करून ठेवली आहे. अशा महान व्यक्तीमत्वास विनम्र अभिवादन…