जळगाव लाईव्ह न्यूज । २८ डिसेंबर २०२२ । मधुकर सहकारी साखर कारखान्याची विक्री केली असून नवीन मालकांनी कर्मचार्यांची थकीत देणी देण्यास नकार केल्याने कर्मचार्यांनी दोन दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. मात्र आज कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. अशातच जळगावचे भाजपचे आमदार राजूमामा भोळे यांनी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर सहकार मंत्र्यांनी या कारखान्याच्या विक्री प्रक्रियेला स्थगिती देण्याची घोषणा केली आहे.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकीत कर्जापोटी बँक सिक्युरटायझेशन नियमाच्या अंतर्गत मधुकर सहकारी साखर कारखान्याची विक्री केली आहे. खासगी मालकाने याचा गाळप हंगाम सुरू केला आहे. परंतु नवीन मालकांनी कर्मचार्यांची थकीत देणी देण्यास नकार केल्याने कर्मचार्यांनी दोन दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. तर आज सकाळपासून आक्रमक पवित्रा घेत रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे.
या दरम्यान, आज सकाळी जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांनी साखर कारखान्याला भेट दिली असता गेटवरच कर्मचार्यांनी त्यांची गाडी अडवून आपला रोष व्यक्त केला. तर काहीही झाले तरी आंदोलन मागे न घेण्याचा इशारा देखील याप्रसंगी कामगारांनी दिला.
दरम्यान, याबाबत भाजपचे आमदार राजूमामा भोळे यांनी विधानसभेत या संदर्भात प्रश्न उपस्थित करून मधुकर साखर कारखान्याच्या निविदा प्रक्रियेचा मुद्दा उपस्थित केला. शेतकरी आणि कर्मचार्यांची मोठ्या प्रमाणात देणी बाकी असतांना फक्त १५ कोटी रूपये घेऊन खासगी मालकाच्या ताब्यात हा कारखाना कसा दिला? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी या निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी केली. यावर सहकार मंत्र्यांनी निविदा प्रक्रियेला स्थगिती देत असल्याची घोषणा केली.