⁠ 
मंगळवार, डिसेंबर 3, 2024
Home | जळगाव जिल्हा | जमीन खरेदी-विक्री करतांना अशी घ्या काळजी अन्यथा होवू शकते फसवणूक

जमीन खरेदी-विक्री करतांना अशी घ्या काळजी अन्यथा होवू शकते फसवणूक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बनावट कागदपत्रे तयार करुन जळगावला कोट्यावधी रुपयांच्या जमीनीची परस्पर विक्री

जळगाव लाईव्ह न्यूज | ७ डिसेंबर २०२२ | खोट्या कागदपत्रांच्या अधारे बनावट सौदा पावती करून पिंप्राळा शिवारातील कोट्यावधीची मालमत्ता हडपण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी विनोद पंजाबराव देशमुख, अ‍ॅड. सुरेखा पाटील, अ‍ॅड. सतीश चव्हाण यांच्यासह ११ जणांविरुद्ध जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित मालमत्तेचे मुळ खरेदीखत वाणी दांपत्याच्या ताब्यात असतांना बनावट सौदेपावत्या तयार करुन मालमत्ता हडप करण्याचा प्रकार समोर आला आहे. अशा प्रकारची ही पहिली घटना नाही. जळगाव शहरासह जिल्ह्यात असेच काहीसे प्रकार या आधीही उघडकीस आले आहेत. यामुळे आज आपण जमीन खरेदी विक्री संबंधी महत्त्वाच्या दस्ताऐवजांची माहिती जाणून घेणार आहोत.

जमीन खरेदी-विक्री करताना बनावट कागदपत्रांव्दारे फसवणूक होण्याची शक्यता असते. एकच जमीन दोन-तीन वेगवेगळ्या लोकांनी विकत घेतल्याचा दावा संबंधितांकडून करण्यात येत असतो. ही फसवणूक टाळण्यासाठी जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करतांना अपडेटेड ऑनलाईन सरकारी कागदपत्रासोबत कागदपत्राची तुलना केली पाहिजे. जमीन खरेदी केल्यानंतर सुरुवातीला त्याचे खरेदीखत रजिस्टर केले जाते. नंतर सातबारावर याची नोंद केली जाते. हा बदल होण्यासाठी दोन तीन महिने सहज जातात. या कालावधीत जमिनीचा मूळ मालक दुस-या ग्राहकाला रजिस्टर खरेदीखत वापरून पुन्हा जमीन विकू शकतो. प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर रजिस्टर खरेदी खताची पहिली तारीख ज्याची तो त्या जमिनीचा नवा मालक ठरतो. म्हणजे पहिलं खरेदीखत कायदेशीर ठरतं. त्यामुळे पुढच्या दोन ते तीन व्यक्तींची फसवणूक होते.

जमीन खरेदी करतांना या गोष्टी तपासून बघा अन्यथा होवू शकते फसवणूक
जमीन खरेदी करताना या काही गोष्टी लक्षात ठेवल्यास तुमची फसवणूक टळू शकते. यात प्रामुख्याने उल्लेख करावयाचा म्हटल्यास, ज्या भागात आपल्याला जमीन खरेदी करायची आहे, त्या गावातील तलाठ्याकडून जमिनीचा नवीन सातबारा काढून घ्यावा. त्यावरील फेरफार आणि आठ-अ उतारे तपासून घ्यावे. सातबारा उतार्‍यावर भूधारणा पद्धतीची नोंद केलेली असते. जर सातबार्‍यावर भोगवटादार वर्ग- १ पद्धत असेल, तर अशा जमीनी हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध नसतात. म्हणजे ही जमीन विक्री करणार्‍याच्या स्वत:च्या मालकीची असून ती खरेदी करताना विशेष अडचण येत नाही. पण, सातबार्‍यावर भोगवटादार वर्ग- २ असं नमूद केलं असेल, तर या जमिनींचं हस्तांतर करण्यावर शासनाचे निर्बंध आहेत. सरकारी अधिकार्‍याच्या परवानगीशिवाय या जमिनींचं हस्तांतर होत नाही. यामध्ये देवस्थान इनाम जमिनी, भूमिहीन शेतकर्‍यांना वाटप केलेल्या जमिनी इ. जमिनींचा समावेश होतो.

साठेखत म्हणजे काय?
साठेखत हा एखादी मिळकत भविष्यात खरेदी करण्यासाठीचा करार असतो. संबंधित मिळकत खरेदी दाराला कोणत्या अटी आणि शर्तींवर हस्तांतरीत होणार आहे या बद्दलची सविस्तर माहिती ही साठेखतामध्ये नमूद केलेली असते. साठेखत ज्या व्यक्तींमध्ये होतो त्यांनाच ठरलेल्या अटी मान्य असतात. परंतु हे मालमत्तेचे हस्तांतरण नव्हे. त्यामुळे कोणतेच हक्क प्रदान होत नाहीत. तर खरेदीखत हे नोदणीकृत असल्याने जगाला मान्य असते. प्रत्यक्ष हस्तांतरण असते. सर्व हक्क प्रदान होतात. त्यामुळे नुसत्या साठेकारारावर न थाबता खरेदीखत अवश्य करून घ्यावे. तेव्हाच मालमत्ता टायटल पूर्णपणे मिळते व रेव्हेन्यु रेकोर्डला म्हणजेच रेकोर्ड ऑफ राईटस ला नाव नोदणी होते.

साठेखत कधीही रद्द होऊ शकते
अनेकवेळा मिळकतीचे किंवा जमिनीचे स्वरूप अशा पद्धतीचे असते की लगेचच जमिनीचे / मिळकतीचे मालकी हस्तांतर करणे शक्य नसते. त्यावेळी अशा व्यवहारा ला कायदेशीर स्वरूप देण्साठी खत केले जाते. बर्‍याचदा काही व्यवहार हे मोठे असतात अशा वेळेस घेणार्‍याकड पूर्ण त्यवहारचे पैसे उपलब्ध नसतात अशावेळेस टोकन म्हणून व्यवहारचे काही पैसे दिलेजातात व उर्वरित रक्कम जर टप्या टप्याने घ्यायची असे घेणार व देणार या दोघामध्ये ठरले असेल तर अशा व्यवहारासाठी घेणार व देणार या दोघांनाही कायदेशीर संरक्षण देण्यासाठी लगेचच खरेदी खत न करता साठेखत केले जाते. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा लक्षात ठेवा खरेदीखत सहजासहजी रद्द होत नाही. परंतू साठेखत हे कधीही रद्द होऊ शकते.

खरेदी खत म्हणजे काय?
खरेदी खत हा एक कायदेशीर दस्तऐवज आहे जो हे सिद्ध करतो की मालमत्ता विक्रेत्याकडून खरेदीदाराकडे हस्तांतरित केली गेली आहे. विक्री कराराची नोंदणी (खरेदीखत) मालमत्ता खरेदीची प्रक्रिया पूर्ण करते. भारतीय नोंदणी अधिनियम, १९०८ नुसार, अशी स्थावर मालमत्ता ज्याचे मूल्य शंभर रुपयांपेक्षा जास्त आहे, अशा मालमत्तेचे हस्तांतरणामध्ये कोणताही करार हा नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. आता महसूल खात्यानं खरेदीचा व्यवहार आता ऑनलाईन सर्व्हरशी इंटरलींक केला आहे. त्यामुळे खरेदीखत रजिस्टर झाल्यावर एक किंवा दोन दिवसात ऑनलाईन सातबारावरती वरच्या बाजूला डावीकडं फेरफार प्रलंबित नंबर लाल अक्षरांमध्ये दिसतो.

author avatar
डॉ. युवराज परदेशी
पत्रकारिता क्षेत्रात गत १८ वर्षांपासून कार्यरत. कॉर्पोरेट कम्युनिकेशन व लॉबिंग या विषयावर पीएच.डी.चे संशोधन. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. तीन पुस्तके प्रकाशित. दैनिक लोकसत्ता, दैनिक देशदूत मधील कामासह महाराष्ट्र विधीमंडळ वार्तांकनाचा दीर्घ अनुभव. दैनिक जनशक्तीचे माजी निवासी संपादक.