जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर येथील जे.ई.स्कुल’चे शिक्षक तथा सुकळी येथील समाधान गायकवाड यांचा मुलगा रशिया येथुन खडतर प्रवास करुन आज सुखरुपपणे घरी परतला आहे. एकी छोट्या खेड्यातील सामान्य कुटुंबातील विद्यार्थी परदेशातुन युध्द जन्य परिस्थितून सुखरुप घरी परतल्याच्या आनंदातून मित्रांनी त्याचे स्वागत केले.

तालुक्यातील सुकळी येथील समाधान गायकवाड यांचा मुलगा अनिकेत वैद्यकीय शिक्षणासाठी रशिया येथील सिम्फोरोपोल या शहरात क्रिमीया विद्यापीठात होता. युध्दसीमा जवळच असल्याने तेथील नागरीक व विद्यार्थी यांच्यामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण तसेच बाॅम्बहल्ल्याची भीती होती. युध्दाला झाल्यानंतर विद्यापीठ बंद करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना घरी परतण्यास सुचना देण्यात आल्या. दरम्यान अनिकेत सह भारतीय चार विद्यार्थी होते.

या भारतीय पाच विद्यार्थांच्या गृपने सिम्फोरोपोल ते माॅस्को असा सुमारे २००० हजार कि.मी.चा रेल्वेने तब्बल ३४ तास प्रवास करत माॅस्को शहर गाठले. दरम्यान माॅस्कोमध्ये वाहतुक सेवा ठप्प असल्याने चार दिवस इथेच काढावे लागले. ‘जळगांव लाईव्ह’च्या प्रतिनिधी शी बोलतांना अनिकेत ने पुढे सांगितले की, कोणत्याही हाॅटेलात आम्हाला घेतले जात नव्हते. याठिकाणी कुणीही आम्हाला कोणत्याच प्रकारची मदत केली नाही. पुर्ण दिवस व रात्र आम्ही विमानतळावर कशीबशी घालवली. नंतर वडीलांच्या मित्राच्या मध्यस्थीने एका हाॅटेलात राहण्याची सोय झाली. तेथे आम्ही चार दिवस थांबलो वाहतुक सुरळीत झाल्यानंतर दि ६ मार्च रोजी माॅस्को ते दिल्ली विमानाने प्रवास करुन, दि ७ मार्च रोजी दिल्ली ते मलकापुर रेल्वेने प्रवास करीत घरी सुखरुप परतलो.
रशियामध्ये कुण्या शासकीय व्यक्तीने प्रवासाबाबत किंवा तेथुन निसटण्याबाबत मदत केली का?
या प्रश्नावर अनिकेत याने नकारार्थी मान हलवत नाही सांगितले. अनिकेत याच्यासोबत पंजाब, केरळ तसेच नागपूर मधील चार विद्यार्थी सोबत होते. विद्यापीठ ते माँस्को पर्यत चा प्रवास अतिशय खडतर झाला. तसेच भोवताली युध्दजन्य परीस्थिती असल्याने विद्यार्थी भेदरलेल्या अवस्थेत होते. पाऊलोपावली मरणाची भीती होती असा अनुभव अनिकेतने ‘जळगांव लाईव्ह’शी बोलतांना आपबीती कथन केली.







