भरधाव टँकरची धडक : दुचाकीस्वार ठार
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ डिसेंबर २०२२ । भरधाव टँकरने धडक दिल्याने जळगावातील दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात शुक्रवारी रात्री खोटेनगरजवळील हॉटेल राधिका समोर घडला. सचिन चंद्रकांत फेगडे (४२, रा.शंकरराव नगर, जळगाव) असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी टँकरचालकाला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरातील शंकरराव नगरात सचिन फेगडे हे पत्नी, मुलगी व भावासोबत वास्तव्यास होते. बांभोरीजवळील एका कंपनीत ते नोकरी करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. शुक्रवार, २ डिसेंबर रोजी सायंकाळी ड्युटी संपल्यानंतर ते दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाले. दरम्यान, ओव्हरटेक करणार्या टँकरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार सचिन फेगडे हे दुभाजकावर आदळल्याने तसेच टँकर त्यांच्या अंगावरुन गेल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली होती. शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरु असतांना रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.
टँकरचालकाने धडक दिल्यानंतर पोलिसांनी टँकरचालक भोला वैजनाथ सोनकर (४३, रा.मदौहा महरीम, ता.मडीयान, जि.मिर्झापूर उत्तरप्रदेश) याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार लिलाधर महाजन करीत आहे.