गुरूवार, डिसेंबर 7, 2023

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम स्थळांची केली ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी पाहणी

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जून २०२३ ।  ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत जळगाव येथे जिल्हास्तरीय कार्यक्रम मंगळवार, 27 जून 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित राहणार आहे.

या कार्यक्रमाचा मुख्य सोहळा पोलीस कवायत मैदान, जळगाव येथे होणार आहे. या कार्यक्रमाची तयारी अंतिम पूर्ण झाली असून ग्रामविकास व पंचायतराज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी आज या ठिकाणाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी अमन मित्तल, महापालिका आयुक्त विद्या गायकवाड, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण योगेश पाटील, प्रांताधिकारी महेश सुधाळकर, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, तहसीलदार नामदेव पाटील यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

यावेळी महाजन यांनी मुख्य स्टेज, सभा मंडप, लोकप्रतिनिधींची व मान्यवर बैठक व्यवस्था त्याचबरोबर लाभार्थ्यांची बैठक व्यवस्था, सरपंचांची बैठक व्यवस्था, शासकीय विभागांमार्फत लावण्यात येणारे विविध स्टॉल, रोजगार मेळावा, कृषि प्रदर्शन, आरोग्य शि‍बिर जागेची पाहणी केली. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना लागू असलेली सुरक्षा व्यवस्था लक्षात घेता काही बदल सुचविले. जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियोजनाची माहिती जिल्हाधिकारी श्री. मित्तल यांनी दिली.

 यावेळी बोलतांना महाजन म्हणाले की, ‘शासन आपल्या दारी’ अभियानातंर्गत जिल्हास्तरीय कार्यक्रम यशस्वीपणे पार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन केलेले आहे. कार्यक्रमाच्या दिवशी येणाऱ्या नागरीक, लाभार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी. वाहनतळ ते कार्यक्रमस्थळावरील मार्गावर वाहतुकीचे नियोजन व्यवस्थीत करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी यंत्रणेला दिल्यात. तसेच शासन आपल्या दारी या मुख्य कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिकांनी तसेच लाभार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.