जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरातील सट्टा, पत्ता हा काही नवीन राहिलेला नाही त्यातच आता ऑनलाईन जुगारची भर पडली आहे. देशभरात अनेक ठिकाणी बदली असलेला रोलेट, फन टार्गेट ऑनलाइन गेम जळगावात सुरू झाला आहे. पोलिसांनी वेळीच कारवाई न केल्यास कर्जबाजारीपणामुळे अनेकांचा बळी जाऊ शकतो.
जळगाव जिल्ह्यात सट्टा, पत्ता हा नेहमीचा विषय असला तरी आता थेट पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर ऑनलाईन जुगाराचा नवीन अड्डा सुरू झाला आहे. नाशिकसह अनेक ठिकाणी मोठा वाद उभा राहिलेला रोलेट आणि फन गेम जळगावात सुरू झाला आहे. दोन्ही गेमचे व्यसन फार घातक तर आहेच परंतु सोबतच ‘दस का दम’ हा ऑनलाईन गेम देखील जळगावात सुरू झाला आहे. नाशिकमध्ये एक तरुण शेतकरी या गेममध्ये ४५ लाख रुपये हरला तर एकाने ३० लाख गमावल्याने आत्महत्या केली. पोलिसांनी या प्रकरणात नाशिक येथील कैलास शहा या मास्टर माईंडला देखील पोलिसांनी अटक केली होती.
‘दस का दम’मध्ये एक २० रुपयांच्या डावला १०० रुपये मिळतात तर फन टार्गेटमध्ये एका गेमला ९ ते ३६ रुपये मिळतात. शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर जुने बस स्थानक शेजारील गल्लीत ३ दुकानात हा गेम सुरू आहे. ऑनलाईन पद्धतीने खेळला जाणाऱ्या या गेमचा निकाल अवघ्या १ मिनिटात येत असतो आणि दिवसभर हा खेळ सुरू असतो. पोलिसांचे अद्याप या खेळाकडे लक्ष वेधले गेले की नाही हा प्रश्न असून पोलिसांच्या आशीर्वादाने हा खेळ सुरू असल्याची देखील चर्चा आहे.
एक ऑनलाईन आयडी तयार केल्यानंतर त्याद्वारे सर्व खेळ खेळले जातात. जळगावातील मुख्य म्होरक्याचा पोलिसांनी शोध घेणे गरजेचे असून त्याला पकडल्यास संपूर्ण साखळी समोर येऊ शकते.
जळगाव शहरात आमच्या हद्दीत कुठे असा खेळ सुरू असल्यास त्यावर लागलीच कारवाई करण्यात येईल, असे शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय ठाकुरवाड यांनी सांगितले.