जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑक्टोबर २०२१ । शहरातील सिंधी कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका तरुणाला फ्लिपकार्डच्या नावाने आलेल्या बनावट कॉलद्वारे गंडा घातल्याचा प्रकार शनिवारी घडला आहे. दरम्यान, याप्रकरणी तरुणाने तक्रारीसाठी शहर पोलीस ठाणे, सायबर विभाग आणि बँकेत फेऱ्या मारल्या असता त्याठिकाणी त्याला दाद देण्यात आली नाही.
सिंधी कॉलनी परिसरात राहणाऱ्या हितेश राजकुमार डहरा या तरुणाचे गोलाणी मार्केटमध्ये मोबाईलचे दुकान आहे. हितेशचे फ्लिपकार्ट खाते बंद पडलेले असल्याने ते सुरू करण्यासाठी त्याने दि.९ रोजी गुगलवर सर्च करून फ्लिपकार्टचा नंबर शोधला. काही वेळानंतर त्याला एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला व समोरील व्यक्तीने तुमचे फ्लिपकार्ड खाते पुन्हा सुरू होईल त्यासाठी आम्ही पाठवत असलेला एक मेसेज एका दुसऱ्या नंबरवर पुढे पाठवा आणि दिलेल्या लिंकवर क्लिक करा असे सांगितले.
फ्लिपकार्ट खाते पुन्हा सुरू होण्यासाठी हितेशने दिलेल्या लिंकवर क्लिक केले असता कुठलाही यूपीआय आयडी किंवा पासवर्ड न टाकता त्याच्या खात्यातून ६ हजार ५०० रुपये काढून घेण्यात आले. काही वेळानंतर प्रकार लक्षात आल्यानंतर हितेशने पुन्हा त्या क्रमांकांवर फोन केला असता समोरून कोणीही प्रतिसाद देत नव्हते. आपली फसवणूक झाली असल्याचे समजल्याने हितेशने शहर पोलीस ठाणे, सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली असता त्यांनी त्याला एकमेकांकडे पाठविले परंतु कोणीही त्याचा तक्रार अर्ज दाखल करून घेतला नाही. हितेशने बँकेत देखील याप्रकरणी तक्रार देण्याचा प्रयत्न केला परंतु बँकेकडूनही त्याला प्रतिसाद मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्यानंतर तक्रार द्यावी तरी कोणाकडे? असा प्रश्न हितेशला पडला असून खात्यात असलेली जेमतेम रक्कमच गेल्याने ऐन सणासुदीच्या काळात करावे काय? असा प्रश्न त्याच्यासमोर उपस्थित राहिला आहे.