सर्वसामान्यांना झटका ! तांदूळ-गहू-पीठ 20 टक्क्यांपर्यंत महाग, भाव आणखी वाढणार
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ सप्टेंबर २०२२ । देशात आधीच महागाईने सर्वसामान्य जनता होरपळून निघत आहे. सणासुदीत महागाईतून दिलासा मिळणार का अशी अपेक्षा सर्वसामान्य करीत आहे. मात्र अशातच देशांतर्गत बाजारात तांदूळ, गहू आणि पिठाच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. देशांतर्गत बाजारपेठेत तांदूळ, गहू, पीठ यासारख्या धान्यांच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारने निर्यात बंद केली, मात्र त्यांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत या खाद्यपदार्थांच्या किमती २० टक्क्यांनी वाढल्याचं अन्न मंत्रालयानं सांगितलं आहे.
अन्न मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशांतर्गत बाजारात तांदूळ, गहू आणि पिठाच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. एका दिवसापूर्वी, मंत्रालयाने तांदूळ, गहू आणि गव्हाच्या पिठाच्या अखिल भारतीय घाऊक आणि किरकोळ किमतींची सरासरी जाहीर केली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी या खाद्यपदार्थांच्या किमतीत 9 ते 20 टक्क्यांनी मोठी वाढ झाल्याचे सांगण्यात आले. या आकड्यांनंतर तांदूळ, गहू आणि पिठाच्या किमती आणखी वाढणार असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.
कृषी मंत्रालयाने बुधवारी सांगितले होते की, या वर्षीच्या खरीप हंगामात तांदळाचे एकूण उत्पादन 104.9 दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे, जे गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात 11.17 लाख टन होते. यानंतर अन्न मंत्रालयाचे वक्तव्य आले असून त्यात तांदूळ, गव्हाच्या किमतीत आणखी वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. कमी उत्पादन अंदाज आणि बिगर बासमती तांदळाची उच्च निर्यात यामुळे तांदूळ, गव्हाच्या किमती वाढण्याचा कल कायम राहील, असे मंत्रालयाने म्हटले आहे.
देशात तांदूळ, पिठाचे सरासरी भाव किती वाढले आहेत
ग्राहक मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशातील तांदळाच्या किरकोळ किमतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 9.03 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर गव्हाच्या किरकोळ किमतीत 14.39 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सर्वात मोठी उडी पीठाच्या किरकोळ किंमतीत आली आहे, जी गेल्या वर्षीपासून 17.87 टक्क्यांनी महागली आहे. जर आपण घाऊक किंमतीबद्दल बोललो तर, तांदळाच्या अखिल भारतीय दैनिक घाऊक किमतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 10.16 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर गव्हाची ही उडी 15.43 टक्के आणि पिठात 20.65 टक्क्यांनी वाढली आहे.
अन्न सुरक्षा योजनांवर परिणाम
कृषी मंत्रालयाने पहिल्यांदाच खरीप हंगाम 2022-23 चा अंदाज जाहीर केला, ज्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी तांदळाचे उत्पादन 6 टक्के कमी असेल असे सांगण्यात आले आहे. यापूर्वी, चालू हंगामासाठी 122 दशलक्ष टन तांदूळ उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, जे आता केवळ 104.9 दशलक्ष टन इतकेच दिसून येत आहे. खरीप उत्पादनात घट झाल्यामुळे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 अंतर्गत देशातील अन्नधान्य वितरणाच्या योजनांवर परिणाम होणार आहे. यावर्षी सुमारे 60 ते 70 लाख टन तांदळाचे उत्पादन कमी होण्याचा अंदाज होता, जो आता 40-50 लाख टन राहू शकतो.