कुसुंबा खुर्द येथे कुपोषणाबाबत घेतला आढावा
जळगाव लाईव्ह न्यूज । २२ नोव्हेंबर २०२१ । कुसुंबा खुर्द येथील अंगणवाडीला एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त रूबल अग्रवाल यांनी भेट दिली. दरम्यान, लाभार्थ्याशी संवाद साधत विभागाकडून मिळणाऱ्या सेवांबाबत माहिती घेतली. तसेच विभागाकडूनही कुपोषण, पोषण आहार याबाबत आढावा घेतला. त्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात महिलांना पोषण किटचे वाटपही करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण अधिकारी देवेंद्र राऊत, नागरी विभागाचे बालविकास प्रकल्प अधिकारी विजयसिंग परदेशी, जळगाव तालुका एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या प्रकल्प अधिकारी सुधा गिंधेवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चव्हाण उपस्थित होते.
पोषण कार्ड वाटप
परिसरातील स्थलांतरित होणाऱ्या लाभार्थ्यांना अखंड सेवा मिळण्यासाठी पोषण कार्डवाटप करण्यात आले.
यावेळी अधिकारी देवेंद्र राऊत यांनी प्रास्ताविक केले. पर्यवेक्षिका अर्चना धामोरे यांनी सूत्रसंचालन केले, तर पर्यवेक्षिका भारती बोरसे यांनी आभार मानले. पर्यवेक्षिका भारती गुरव यांच्यासह अंगणवाडी सेविकांनी परिश्रम घेतले.