⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

परतीच्या पावसाचा १६ हजार हेक्टर क्षेत्राला फटका

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑक्टोबर २०२१ । यावल तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसाने १६ हजार ४८६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. रविवार दि.१७ झालेल्या पावसामुळे सांगवी खुर्द भागातील केळी जमीनदोस्त झाली असून या भागातील नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. कापूस पिकाचे बोन्ड झाडावर सडले. यातुन सावरत नाही तोच परतीच्या पावसाने जोर धरल्याने उरलेले पीकही शेतकऱ्याच्या हातून गेले आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसाने तालुक्यातील १६ हजार ४८६ हेक्टरवरील केळी, कापूस, सोयाबीन व ज्वारीचे नुकसान झाले. हे पंचनामे पूर्ण होत नाही तोच रविवारी झालेल्या पावसामुळे केळी पिकाला फटका बसला.

१९ हजार २६२ शेतकऱ्यांचे नुकसान
सांगवी खुर्द भागात नुकसानीची तीव्रता जास्त आहे. ऑक्टोबरमध्ये १९ हजार २६२ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पंचनाम्यांनुसार ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसानीत जिरायती कपाशी ७,८२४.७४ हेक्टर, ज्वारी २०.३७, सोयाबीन १२५.८९ आणि ७,३८६ हेक्टर केळीचा समावेश आहे.