⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

अज्ञात माथेफिरूने तब्बल 2000 केळीचे घड कापून फेकले ; यावल तालुक्यातील प्रकार

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ डिसेंबर २०२३ । यावल तालुक्यातील अट्रावल येथे अज्ञात माथेफिरूने तब्बल दोन हजार केळीचे घड कापून नासधूस केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे शेतकऱ्याचे तब्बल अडीच लाखांचे नुकसान झाले आहे. यावल पोलिसात अज्ञात माथेफिरूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.

याबाबत असे की, अट्रावल (ता. यावल) येथील शेतकरी राजेंद्र व्यंकट चौधरी यांनी चिंतामण पंढरीनाथ तायडे यांचे शेत गट क्रमांक ४५५ हे बटाईने केलेले आहे. या शेतात त्यांनी केळी पिकाची लागवड केली होती व आता केळी कापणीवर आली आहे.

दोन महिन्यापूर्वीच त्यांनी तोंडी बोलणी करून कापणीवर आलेली केळीच्या व्यवहार व्यापाऱ्यासोबत केला होता व प्रती घड ५ हजार ५०० रूपयांत दिला होता व त्यातील दीड हजार घड कापणी देखील झाली होती तर उर्वरित केळीच्या घडापैकी २ हजार केळीच्या झाडावरील घड शुक्रवारी मध्यरात्रीनंतर माथेफिरूने त्यांच्या शेतात जाऊन कापून नासधूस केली. यात शेतकऱ्याचे जवळपास अडीच लाखांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात चिंतामण तायडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नितीन चव्हाण तपास करीत आहेत.