⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

आता खान्देशात परतीचा मान्सून ५ ऐवजी ‘या’ तारखेपर्यंत परतणार, शेतकऱ्यांची चिंता वाढणार?

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑक्टोबर २०२२ । सध्या राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला असला तरी राज्याच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील काही भागात रविवारी जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात एक दोन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे. तसेच रेंगाळलेला परतीचा मान्सून आता खान्देशात ५ ऐवजी १० ऑक्टाेबरपर्यंत परतणार असल्याचा अंदाज आहे.

मागील काही दिवसापासून राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतल्याने उन्हाचा उकाडा वाढलेला दिसून आला. तर काही ठिकाणी अधून मधून पावसाने हजेरी लावली आहे. जळगाव जिल्ह्यात देखील तुरळक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. रविवारी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेती पिकांचे नुकसान झालेले आहे. अशातच हवामान खात्याने पुढील काही दिवसासाठी राज्यातील अनेक भागांना पावसाचा अलर्ट जारी केला आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, परतीचा मान्सून देखील लांबणीवर पडला आहे. गेल्या आठवड्यापासून राजस्थानातच रेंगाळलेला परतीचा मान्सून आता खान्देशात ५ ऐवजी १० ऑक्टाेबरपर्यंत परतणार असल्याचा अंदाज आहे. सध्या केवळ राजस्थान आणि गुजरातच्या पश्चिक किनारपट्टीतून मान्सून परतीच्या मार्गावर आला आहे. भारत माैसम विभागाने मान्सूनच्या परतीचा अंदाज व्यक्त करताना ५ ऑक्टाेबरपर्यंत मान्सून उत्तर महाराष्ट्रातून दक्षिणेकडे परत जाणार असल्याचे म्हटले हाेते. दरम्यान, हवामान विभागाच्या २ ऑक्टाेबरच्या निरीक्षण नाेंदीनुसार मान्सून अद्यापही राजस्थान आणि गुजरातमध्ये रेंगाळलेला आहे.