ढगाळ वातवरण, तरीही उष्णतेपासून दिलासा नाहीच ; जिल्ह्यात आजपासून आठवडाभर असे राहणार तापमान..

एप्रिल 22, 2024 9:49 AM

जळगाव लाईव्ह न्युज : २२ एप्रिल २०२४ : राज्यात उन सावलीचा खेळ सध्या पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी उन्हाचा तडाखा वाढला असता त्यातच अवकाळी पाऊस हजेरी लावताना दिसत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसापासून जळगाव जिल्ह्यात कडाक्याच्या उन्हांमुळे जळगावकरांच्या अंगाची लाही लाही झाली होती. त्या तुलनेत काल रविवारी तापमानात घट होऊन, दिवसभर ढगाळ वातावरण कायम राहिले होते. त्यामुळे जळगावकरांना काही अंशी दिलासा मिळाला, मात्र, हा दिलासा केवळ एका दिवसापुरताच राहण्याची शक्यता आहे. कारण, आगामी आठवड्यात पुन्हा तापमानाचा पारा ४३ अंशांपर्यंत राहणार आहे.

tapman

गेल्या दोन आठवड्यांपूर्वी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. आता आठवडाभरापासून तापमानात वाढ होत असताना, रविवारी अचानक वातावरणात बदल होऊन दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या जळगावकरांना दिलासा मिळाला. रविवारी जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती.त्यानुसार तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या.

आज सोमवारी देखील सकाळपासून ढगाळ वातवरण आहे. मात्र आगामी आठवड्याभरात तापमानाचा पारा ४३ अंशापर्यंत कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. जिल्ह्यात आगामी आठवडाभर उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज असल्यामुळे दिवसाचा पारा सतत पाच ते सहा दिवस ४२ अंशाच्या पुढेच राहण्याची शक्यता आहे. यासह रात्रीच्या तापमानातही वाढ होणार आहे.

असे राहणार आगामी पाच दिवस तापमान
२२ एप्रिल रोजी तापमान ४१ अंश, काही अंशी ढगाळ वातावरण राहील
२३ रोजी तापमान ४२ अंश, मुख्यत निरभ्र आकाश, सायंकाळनंतर मात्र काही अंशी ढगाळ वातावरण
२४ एप्रिल रोजी तापमान ४२ अंश, काही अंशी ढगाळ वातावरण राहील
२५ रोजी तापमान ४३ अंश, काही अंशी ढगाळ वातावरण राहील
२६ रोजी तापमान ४३ अंश, काही अंशी ढगाळ वातावरण राहील

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now