⁠ 
मंगळवार, एप्रिल 30, 2024

यंदाच्या मान्सून संदर्भात हवामान खात्याचा अंदाज आला रे..! महाराष्ट्रात कसा असेल मान्सून?

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२४ । सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये सूर्य आग ओकत आहे. वाढत्या तापमानाने उकाड्यात मोठी वाढ झाली असून यामुळे नागरिक हैराण झाले. त्यातच अनेक ठिकाणी पाणी टंचाईला सामोरे जावं लागत आहे. यामुळे उन्हाळ्यानंतर नागरिक पावसाळ्याची वाट पाहतोय. मात्र यंदाचा पावसाळा कसा असेल असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. अशातच भारतीय हवामान खात्याने यंदा देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रासह 25 राज्यांत चांगल्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यावर्षी 8 जूनपर्यंत मान्सून येणार असून जून ते सप्टेंबरदरम्यान पावसाळा असणार असल्याची माहिती हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक एम. मोहपात्रा यांनी दिलीय.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) आज सोमवारी सांगितले की, यावेळी जून ते सप्टेंबरपर्यंत मान्सून सामान्यपेक्षा चांगला राहील. हवामान विभाग (IMD) सरासरीपेक्षा 104 ते 110 टक्के पाऊस चांगला मानतो. हे पिकांसाठी चांगले लक्षण आहे. IMD ने म्हटले आहे की 2024 मध्ये 106% म्हणजेच 87 सेमी पाऊस पडू शकतो. 4 महिन्यांच्या पावसाळी हंगामासाठी दीर्घ कालावधीची सरासरी (LPA) 868.6 मिलीमीटर म्हणजेच 86.86 सेंटीमीटर आहे. म्हणजे पावसाळ्यात इतका एकूण पाऊस पडला पाहिजे.

“अल निनो कमकुवत होत आहे, मान्सून सुरू होईपर्यंत तो तटस्थ अवस्थेत प्रवेश करेल,” असे IMD चे प्रमुख मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले. या वर्षी मान्सूनच्या दुसऱ्या हंगामात ‘ला नीना’ हवामानाची स्थिती विकसित होताना दिसत आहे. “भारतातील चांगल्या मान्सूनशी संबंधित ला नीना परिस्थिती ऑगस्ट, सप्टेंबरपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे, असं IMD ने म्हटले आहे.

हवामान कार्यालयाच्या अंदाजानुसार, वायव्य, पूर्व आणि ईशान्य भारतातील काही भाग वगळता, जेथे सामान्यपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे, त्याशिवाय देशातील बहुतेक भागांमध्ये सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर देशातील काही भागात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

या राज्यांमध्ये सामान्यपेक्षा जास्त पाऊस अपेक्षितः
केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, चंदीगड, हरियाणा, दिल्ली, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, पुद्दुचेरी, अंदमान आणि निकोबार बेटे, लक्षद्वीप, दादरा आणि नगर हवेली, दमण-दीव.

4 राज्यांमध्ये सामान्य पाऊस अपेक्षित: छत्तीसगड, हिमाचल, जम्मू आणि काश्मीर आणि लडाख.
6 राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस अपेक्षितः ओडिशा, आसाम, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा.