शिरसोली नेहरे तलावाचा ठेका रद्द करून स्थानिक संस्थेला न्याय द्या; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

मे 20, 2026 3:26 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव तालुक्यातील शिरसोली नेहरे (३५ हेक्टर) या तलावाच्या कार्यक्षेत्रात येणारे पाझर तलावाचा ठेका नियमबाह्य पद्धतीने परगावातील संस्थेला दिल्याचा आरोप करत, हा ठेका तात्काळ रद्द करण्याची मागणी ग्रामीण पाणीपुरवठा सिंचन मच्छिमार सहकारी संस्था मर्यादित, शिरसोली यांनी केली आहे. संस्थेच्या वतीने आज जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना यासंदर्भात अत्यंत तातडीचे निवेदन देण्यात आले.

shirsoli nehre

नेमके प्रकरण काय?

शिरसोली येथील ग्रामीण पाणीपुरवठा सिंचन मच्छिमार सहकारी संस्था ही २००३ पासून नोंदणीकृत असून, शिरसोली नेहरे तलाव हे तिचे हक्काचे कार्यक्षेत्र आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, कोरोना कालावधीत निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींमुळे ही संस्था ठेक्याची रक्कम वेळेत भरू शकली नव्हती. मात्र, शासनाचे ‘नरमाईचे धोरण’ असतानाही संबंधित विभागाने या संस्थेला २८/१२/२०२१ ते २७/१२/२०२७ या सहा वर्षांच्या कालावधीसाठी बेकायदेशीरपणे काळ्या यादीत टाकले.

बाहेरील संस्थेला ठेका दिल्याचा आरोप

संस्थेचे सचिव आनंदा दगडू भोई यांनी निवेदनात म्हटले आहे की, स्थानिक संस्थेवर अन्याय करून या तलावाचा ठेका जळगाव तालुक्याबाहेरील भुसावळ येथील ‘साळशिंगी मच्छिमार सहकारी उत्पादक सोसायटी’ला देण्यात आला आहे. प्रत्यक्षात ही संस्था तेथे कार्यरत नसून, यामुळे स्थानिक आदिवासी, भिल्ल आणि कष्टकरी मजुरांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

निवेदनातील प्रमुख मागण्या :

शिरसोली संस्थेला बेकायदेशीरपणे टाकलेले ‘काळ्या यादी’तून १५ दिवसांत बाहेर काढावे. 
बाहेरील संस्थेला दिलेला नियमबाह्य ठेका तात्काळ रद्द करावा. 
तलावाचा ताबा मूळ स्थानिक संस्थेला द्यावा; संस्था नियमानुसार ठेक्याची सर्व रक्कम भरण्यास तयार आहे. 
या प्रकरणी १५ दिवसांत लेखी उत्तर न मिळाल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. 

मंत्र्यांसह विविध विभागाला दिले निवेदन

ग्रामीण पाणीपुरवठा सिंचन मच्छिमार सहकारी संस्था मर्यादित, शिरसोली यांच्यातर्फे आज जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना निवेदन देण्यात आले आहे. याप्रसंगी मच्छिमार संघटनेचे बाळासाहेब सैंदाने, आनंदा भोई, भिकन भोई, लक्ष्मण भोई, शांताराम भिल, आशाबाई बारी, विनोद भोई, मनोज परदेशी, पिंटू भोई, सय्यदा खाटीक, आनंदा कोळी, प्रेमचंद यशवंत भिल, छगन भोई, जगन भिल, दगडू खलसे, संजय भिल, बाबलाल यशवंत भिल, बाबलाल भिल, संतोष भोई, दामू भोई, शकुंतला भिल, भगवान कोळी, भरत परदेशी, शत्रुघ्न सपकाळे, वना भोई, चतर भोई आदींसह इतर सदस्य उपस्थित होते. दरम्यान, हे निवेदन राज्याचे पदुम विभाग मंत्री नितेश राणे (पदुम विभाग), मुख्य सचिव, उपसचिव, मुख्याधिकारी जळगाव जिल्हा परिषद आणि मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त यांच्यासह इतर संबंधित विभागांनाही माहितीसाठी पाठवण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories