यावल येथील सूत गिरणी भाडेतत्वावर द्या : मनसे
जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल तालुक्यातील एकमेव रोजगार असणारी सूतगिरणी ही अनेक वर्षांपासून बंद आहे. यामुळे अनेक नागरिकांचे रोजगार बुडाले असून ती सूत गिरणी भाडेतत्वावर देण्यात यावी. जेणेकरून यावल शहरातील व तालुक्यातील अनेक बेरोजगारांना रोजगार मिळेल. अशी मागणी मनसेचे जनहित जिल्हाध्यक्ष चेतन आढळकर यांनी जळगाव जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अनेक वर्षांपासून सूत गिरणी बंद असून सुतगिरणीच्या संचालकांनी निर्णय घेऊन विक्री करण्याचा विचार केला आहे. परंतु सुतगिरणी विक्री न करता ती भाडेतत्त्वावर देण्यात यावी. जेणेकरून यावल शहरातील व तालुक्यातील अनेक बेरोजगारांना रोजगार मिळेल. यावल शहरातील व तालुक्यातील एकेकाळी वैभव समजल्या जाणाऱ्या शेतकरी हिताचा व कामगारांची सूतगिरणी या मोठ्या प्रकल्पावर मालमत्ता जप्तची वेळ आल्याने तालुक्यातील सहकार क्षेत्रातील उद्योगतीकडे वाटचाल झाल्याने शेतकरी बांधवांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. त्यामुळे सर्व संचालक मंडळांनी सुतगिरणी भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेण्यात यावा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन किंवा उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. तसेच मधुकर साखर कारखान्याकडे थकित असलेले आधीचे कर्ज जिल्हा बँक एनपीए केले आहे. त्यामुळे कारखान्याला नव्याने कर्ज मिळण्यास मार्ग बंद झाला आहे. मधुकर साखर कारखान्याच्या सर्व कामगार व शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत मनसे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. कारखाना अखंडपणे सुरू राहावा याकरिता तो भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेण्यात आला. तो कामगार व शेतकरीविरोधी नसावा भाडेतत्वावर कारखाना देण्यात आल्यास सेवानिवृत्त कर्मचारी यांचे नातेवाईक आणि सध्या जे कामगार आहेत तेच कामगार कारखान्यात काम करतील असा निर्णय घेण्यात यावा. दोन दिवसात या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मनसेच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रती सहकारमंत्री, पालकमंत्री व साखर आयुक्त पुणे यांना देण्यात आले आहे. या निवेदनावर मनसेचे जनहित जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर, तालुका उपाध्यक्ष श्याम पवार, तालुका उपाध्यक्ष अनिल सपकाळे, शहराध्यक्ष किशोर नन्नवरे, विद्यार्थी सेनेचे गौरव कोळी आणि महाराष्ट्र सैनिकाचे अजय तायडे यांच्या स्वाक्षर्या आहेत.