नातेवाईक नसल्याने खाजगी रुग्णालयांनी नाकारले; अखेर “शावैम” मध्ये झाली शस्त्रक्रिया
जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जानेवारी २०२२ । येथील एका नातेवाईक मिळून येत नसलेल्या महिलेला कर्करोग झालेला होता. अनेक खाजगी रुग्णालये नातेवाईक नसल्याने महिलेवरील उपचारासाठी नकार देत होती. अखेर ही महिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे तपासणीसाठी आली. येथे कर्करोगाची शस्त्रक्रिया करून तिचे प्राण वाचविण्यात वैद्यकीय पथकाला यश आले.
जळगाव येथील साठ वर्षीय रहिवासी महिलेचे आई-वडीलांचे निधन झाले असून ती अविवाहित आहे. तिच्या उजव्या स्तनाजवळ कर्करोगाची गाठ होती. उपचारासाठी तिने अनेक खाजगी रुग्णालयांचे उंबरठे झिजवले. मात्र नातेवाईक नसल्याने त्यांच्यावर उपचार करण्यासाठी कोणी तयार होत नव्हते. अखेर हि महिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे तपासणीसाठी शल्यचिकित्सा विभागात आली. तेथे विविध तपासणी करून तिच्या कर्करोगाचे योग्य निदान झाले.
शरीरात अजून कर्करोग पसरलेला नव्हता. त्यामुळे, शस्त्रक्रिया करणे महत्वाचे होते. नातेवाईकांची अधिक काळ वाट न पाहता तत्काळ शस्त्रक्रिया करून महिलेला दिलासा देण्यात आला. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून महिलेची शस्त्रक्रिया मोफत झाली.
शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. मारोती पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रशांत देवरे, डॉ. समीर चौधरी, डॉ. मिलिंद चौधरी, डॉ. बिपीन खडसे, डॉ. प्रज्ञा सोनवणे यांनी शस्त्रक्रिया केली. त्यांना बधिरीकरणशास्त्र (भूल) विभागाचे प्रमुख डॉ. संदीप पटेल, डॉ. स्वप्नील इंकणे, डॉ. हर्षद महाजन, शास्त्रक्रियागार विभाग इन्चार्ज यशोदा जोशी, कर्मचारी यांनी सहकार्य केले.
वेळीच उपचार मिळाल्यामुळे महिलेने वैद्यकीय पथकांचे आभार मानले आहे. तसेच, वैद्यकीय पथकाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी कौतुक केले आहे.
हे देखील वाचा :