जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावातील बेरोजगार तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे जळगाव शहरात लवकरच सुरु होणाऱ्या पर्यावरणपूरक ई-बस सेवेच्या दैनंदिन संचलनासाठी १२० वाहक (कंडक्टर) पुरवठादाराची नेमणूक करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी महानगरपालिकेने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिता २० कोटी २ लाख १७ हजार ६०० रुपयांची ई-निविदा प्रसिद्ध केली आहे.

केंद्र शासनाच्या पीएम ई-बस योजनेंतर्गत जळगाव शहरासाठी एकूण ५० ई–बस मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ३० बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. या ३० बसेसमध्ये १२ मीटर लांबीच्या २४ मोठ्या प्रवासी क्षमतेच्या बसेस आणि नऊ मीटर लांबीच्या सहा मध्यम आकाराच्या बसेसचा समावेश असेल. मोठ्या बसेस मुख्य मार्गांवर धावणार असून, मध्यम आकाराच्या बसेस उपनगर व अंतर्गत भागांसाठी उपयोगी ठरणार आहेत.

ई–बस सेवेच्या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची उभारणी वेगाने सुरू असून, ई–बस आगाराच्या वाहनतळाचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. चार्जिंग स्टेशन, विद्युत पुरवठा यंत्रणा, देखभाल केंद्र, नियंत्रण कक्ष आदी सुविधा उभारण्याचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच बस गाड्यांचा ताफा शहरात दाखल होण्याची शक्यता आहे

जळगाव शहर आणि परिसरातील प्रवाशांना नियमित आणि दर्जेदार सेवा देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. ही गरज लक्षात घेऊन महापालिकेकडून १२० वाहकांची भरती केली जाणार असून, इच्छुक व पात्र पुरवठादारांना २३ फेब्रुवारी २०२६ पासून अधिकृत संकेतस्थळावर अटी व शर्तीसह सविस्तर तपशील उपलब्ध करून देण्यात आला आहे. दरम्यान, महानगरपालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी कोणत्याही टप्प्यावर निविदा स्वीकारण्याचा अथवा रद्द करण्याचा अधिकार स्वतःकडे राखून ठेवला आहे. त्यामुळे निवड प्रक्रियेत काटेकोरपणा राखला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, ई–बस सेवेसाठी १२० वाहक (कंडक्टर) पुरवठादाराची नियुक्ती करण्यासाठी महानगरपालिकेने तब्बल २० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची ई–निविदा प्रसिद्ध केली आहे. या निर्णयामुळे शहरातील तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहे.










