जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यातील आरोग्य विभागात लवकरच मेगाभरती होण्याची शक्यता आहे. ठाण्यात रुग्णांच्या मृत्यू प्रकरणानंतर सरकारला जाग येऊन भरती प्रक्रियेला वेग आला आहे.

ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच दिवशी १७ रुग्णांच्या मृत्यूने एकच खळबळ उडाली होती. मात्र रुग्णसंख्येच्या तुलनेत डॉक्टर, कर्मचाऱ्यांची संख्या कमी असणे, हे एक कारण या घटनेला असल्याचं निदर्शनास आलं होतं. राज्यभरातील अनेक रुग्णालयांची स्थिती अशीच आहे. सरकारी रुग्णालयांची हीच अडचण दूर करण्यासाठी सरकारने वेगाने हालचाली सुरु केल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोग्य विभागाची नोकर भरती अंतिम टप्प्यात आहे. आरोग्य विभागात ‘क’ आणि ‘ड’ श्रेणीतील ११,९०३ जागांसाठी पुढील आठवड्यात जाहिरात निघण्याची शक्यता आहे. रिक्त जागा एमपीएससी, राज्य निवड मंडळ आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्यामार्फत भरल्या जातात.
गट क संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक, आस्थापनेवरील पदे यामध्ये लिपिक, टंकलेखक, वाहनचालक यांसारख्या पदांचा समावेश आहे. तर ‘गट ड’ संवर्गात शिपाई, सफाई कामगार, कक्षसेवक यांसारख्या पदांचा समावेश आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठ पदे रिक्त असल्याने त्याचा भार कनिष्ठ अधिकाऱ्यांवर पडत आहे. या कार्यपद्धतीवर अधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे ही रखडलेली नोकर भरती पूर्ण करण्यासाठी वेग आलेला पाहायला मिळत आहे.