जळगावात यंदाच्या खरिपात ‘या’ पिकाची विक्रमी पेरणी ; कापसाच्या क्षेत्रात मोठी घट

जुलै 3, 2025 2:46 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जुलै २०२५ । जळगाव जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात मक्याची विक्रमी पेरणी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल १ लाख ३९ हजार १३४ हेक्टर क्षेत्रावर मका पेरण्यात आला आहे, जो सरासरी पेरणी क्षेत्राच्या तब्बल १५० टक्के आहे. तर दुसरीकडे पांढर सोनं म्हणून ओळख असलेल्या कापसाच्या पेरणीत मोठी घट दिसून आली.

kharip perni

यंदा खरिपात मका हे जिल्ह्यातील सर्वाधिक पेरणी झालेले पीक ठरले आहे. तर कापसाच्या क्षेत्रात घट झाली. खरंतर जिल्ह्यात कापसाची सरासरी पेरणी ५ लाख ४६ हजार ९३३ हेक्टर असताना, प्रत्यक्षात केवळ ४ लाख ५ हजार ८१६ हेक्टरवरच पेरणी झाली आहे, जी सरासरीच्या ७४.२० टक्के आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि तुरीला चांगली पसंती दिली आहे. सोयाबीनची पेरणी सरासरीच्या ९४.७२ टक्के म्हणजे १८ हजार ४६८ हेक्टरवर झाली आहे, तर तुरीची पेरणी सरासरीच्या १०८ टक्के झाली असून, एकूण १२ हजार ९६६ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

या कारणामुळे वाढले मक्याचे क्षेत्र?

मक्याला सध्या चांगला बाजारभाव मिळत आहे. चारा म्हणून मक्याला मोठ्या प्रमाणावर मागणी असते, ज्यामुळे शेतकऱ्यांना नफा मिळतो. मक्याचे पीक साधारणपणे २० दिवसांत तयार होते. यामुळे शेतकऱ्यांना एकाच वर्षात एकापेक्षा जास्त पिके घेण्याची संधी मिळते. कापसाच्या तुलनेत मक्याला कमी पाण्याची आवश्यकता असते. ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता अनिश्चित असते, तेथे मका अधिक सुरक्षित पर्याय ठरतो.

कापसाचे क्षेत्र का घटले..?

कापसाला मक्याच्या तुलनेत पाणी जास्त लागते. जिल्ह्यातील बरेच क्षेत्र कोरडवाहू आहे. अनियमित पाऊस किंवा दुष्काळामुळे कापसाचे पीक धोक्यात येते. बोंडअळीची समस्या कायम असते. कापूस लागवडीसाठी मजूर आणि बियाणे, खतांवर मोठा खर्च येतो. कापसाच्या बाजारभावात अनेकदा चढ-उतार दिसून येतात. शेतकऱ्यांना उत्पन्नाबाबत अनिश्चितता वाटते.

विविध पेरण्यांची अशी आहे स्थिती (हेक्टर)

पीक – झालेली पेरणी.. आणि टक्केवारी
कापूस- झालेली पेरणी.. ४ लाख ५८१६… ७४.२० टक्के
सोयाबीन -झालेली पेरणी.. १८४६८… ९४.७२ टक्के
उडीद -झालेली पेरणी.. ९८८७… ६१.७० टक्के
मूग -झालेली पेरणी.. ९२७५… ५१.९१ टक्के
तूर -झालेली पेरणी.. १२९६६… १०८ टक्के

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now