⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

संक्रांतीला पंतग उडविण्यासाठी ‘जीवघेणा’ नायलॉन मांजा घेण्याआधी हे वाचा…

जळगाव लाईव्ह न्यूज | ४ जानेवारी २०२३ | मकर संक्रांतील (Makar Sankranti) तीळ गुळ वाटपाचे जसे महत्व आहे तसेच महत्व पतंग उडविण्यासही आहे. मकर संक्रांतीच्या सुमारे १५ दिवस आधीपासून पतंग उडविण्यास सुरुवात होते. या दिवसांमध्ये पतंग उडविण्यासाठी वापरल्या जाणार्‍या मांजामुळे गळा चिरुन जखमी होणार्‍यांचे प्रमाण वाढते. गतवर्षी जळगावमधील शिवाजीनगर भागात पंतगाच्या मांजामुळे एका डॉक्टरचा गळा चिरला गेल्याची घटना घडली होती. राज्यात काही जणांना प्राण देखील गमवावे लागले आहे. उच्च न्यायालयाने नायलॉन मांजा विक्रीस बंदी केली आहे. तरीही नायलॉन मांजाचा सर्रास वापर होतो. दोन दिवसांपूर्वीच जळगाव महापालिकेतर्फे तपासणीची धडक मोहीम राबवून पतंग गल्लीत एका दुकानावर छापा टाकून कुलरमध्ये लपविलेला नायलॉन मांजा जप्त करण्यात आला व त्यांना पाच हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे.

पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाला मुलांची पसंती असते. कारण नायलॉन मांजा असला तर त्यांची पतंग कुणीच कापू शकणार नाही, असे त्यांना वाटते. मात्र त्याच नायलॉन मांजामुळे कुणाचा तरी जीव जावू शकतो, याची त्यांना कल्पना नसते. गत दोन-तीन वर्षात नायलॉन मांजामुळे मान कापली जावून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या शिवाय जो पतंग उडवितो त्याची बोटे देखील कापली जाण्याची दाट शक्यता असते. पर्यावरणाचा विचार केल्यास हा नायलॉन मांजा पर्यावरणासाठीही घात आहे. कारण तो लवकर नष्ट होत नाही. हा प्रकार थांबविण्यासाठी नायलॉन मांजावर न्यायालयाने बंदी घातली आहे. तरीही याची विक्री मोठ्या प्रमाणात होेते. हा प्रकार थांबविण्यासाठी केवळ किरकोळ विक्रेत्यांना अटक करुन फारसे काही होणार नाही. उत्पादन, एजंट, विक्रेते आणि ग्राहक यांची वर्गवारी करूनच नायलॉन आणि चायना मांजाचे रॅकेट मोडून काढायला हवे.

नैसर्गिक आणि कृत्रिम धागे
पर्यावरण पुरक अर्थात नैसर्गिक आणि कृत्रिम अशा दोन पद्धतीने कोणत्याही धाग्यांची निर्मिती होते. नैसर्गिक पद्धतीने अर्थात, कापसापासून अथवा वनस्पती, कीटक यापासून तयार केलेल्या धाग्यांचे आयुष्य ठरलेले असते. पतंगोत्सवात याच धाग्यांचा वापर पूर्वी होत होता. मात्र, अलीकडच्या काही वर्षांपासून कृत्रिम अर्थात नायलॉन मांजाचा वापर वाढला आहे. नायलॉन म्हणजे प्लास्टिकपासून तयार होणारा हा धागा सहज तुटत नसल्याने पतंगबाजी करणार्‍यांकडून यास मोठी मागणी असते. संक्रांतीदरम्यान नायलॉन मांजाचा वापर होतो. या मांजावर बंदी असली तरी ती केवळ कागदोपत्री असते. नायलॉन मांजाची विक्री आणि वापर थांबविणे प्रशासनास शक्य झालेले नाही.

हानीकारक रसायनांचा वापर
या कृत्रिम धाग्यासाठी पॉलिअमाइड, पॉलिक्रिलोनायट्राइल, पॉलिएस्टर, पॉलिएथिलिन, पॉलिव्हिनिल क्लोराइड, पॉलिव्हिनिल अल्कोहोल, कोपॉलिमर, पॉलिप्रोपिलिन अशा रसायनांचा वापर होतो. अर्थात, या मजबूत धाग्यांचा वापर मासेमारीसाठी वापरण्यात येणार्‍या जाळ्यांसाठी होत असतो. नायलॉनाच्या खालोखाल पॉलिव्हिनिल क्लोराइडच्या धाग्याचा उपयोग होतो. यालाच प्लास्टिक म्हणतात व यापासून मोनोफिलामेंट म्हणजे बिनपिळाचा धागा तयार होतो. औद्योगिक दृष्टिकोनातून विचार केल्यास या धाग्यांचे महत्त्व मोठे आहे. मात्र याचा वापर कुठे करावा, याचेही काही निकष आहेत. मात्र आता पतंगबाजीसाठीही या धाग्याचा वापर केला जात असल्याचे दिसून येते.