जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२१ । रावेर ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सिजन कोविड सेंटरमध्ये कोरोनाच्या उपचारार्थ दाखल झालेली तांदलवाडी (ता. रावेर ) येथील महिला कोणालाही न सांगता आज शनिवारच्या पहाटे निघून गेल्याने रुग्णालयात चांगलीच खळबळ उडाली. मात्र, पोलीस प्रशासनाने काही तासातच त्या महिलेचा शोध घेत तिला परत कोविड सेंटर ला दाखल केले.

याबाबत असे की, रावेर शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार चांगलाच वाढला आहे. दिवसेंदिवस बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. दरम्यान, रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथील 65 वर्षीय वृद्ध महिला रावेर ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सिजन कोविड सेंटरमध्ये कोरोनाच्या उपचारार्थ दाखल झाली होती.आज पहाटे 5 वाजेच्या सुमारास ही महिला सेंटरवरून निघून गेली. यावेळी तिच्या नातेवाईकांनी सेंटरच्या कर्मचाऱ्यांना याची विचारणा केली. मात्र याबाबत त्यांना काहीही माहिती नव्हती. यामुळे नातेवाईक व कर्मचाऱ्यांमध्ये सकाळी शाब्दिक चकमक झाली. ही महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याने ती कुठे असेल याबाबत सर्वांना काळजी होती.
याबाबत काही जणांनी येथील पोलीस निरिक्षक रामदास वाकोडे यांना ही घटना कळविली. तातडीने पोलीस उपनिरीक्षक मनोहर जाधव, पोलीस नाईक सुनील वंजारी, गोपाळ पाटील यांनी रावेर शहराच्या चारही दिशेला शोध घेतला. दरम्यान ही महिला रेल्वे स्थानक रोडवरील जुना पुनखेडा रोडवरील बौद्ध नगरीच्या पुढील बाजूस जुन्या स्मशानभूमीजवळ केळीच्या बागेत एका झाडाखाली बसलेली आढळून आली.या महिलेस पोलिसांनी ताब्यात घेऊन पुन्हा ऑक्सीजन सेंटरवर आणले. यामुळे पोलीस , ग्रामीण रुग्णालय प्रशासन व नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास टाकला.