जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ डिसेंबर २०२५ । जळगाव महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत शहरातील राजकारण तापलं आहे. जळगाव महापालिकेच्या ७५ जागांसाठी शेवटच्या दिवशी एक हजाराच्या वर उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. यामुळे निवडणूक चुरशीची होणार आहे. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक ज्ञानेश्वर ढेरे यांनी निवडणुकीसाठी उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाचे दरपत्रक प्रसिद्ध केले आहे.

त्यानुसार चहासाठी ५ ते ७ तर राईस प्लेटसाठी ६५ रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. सध्याच्या बाजारभावानुसार हे दर निश्चित करण्यात आले असल्याने उमेदवारांना खर्चाचा हिशेब देताना मोठी कसरत करावी लागणार नाही. केवळ अन्नच नाही, तर शाल (२०० रु.), पुष्पगुच्छ (१००-३५० रु.), ढोल-ताशा पथक (३,००० रु.) आणि बेंजो (२,००० रु.) यांचेही दर निश्चित करण्यात आले आहेत.

प्रत्येक उमेदवारासाठी ९ लाख रुपयांची खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येक प्रचार सभा, रॅली किंवा कार्यक्रमाचे फोटो, अधिकृत बिले आणि उपस्थितांची यादी निवडणूक विभागाकडे सादर करावी लागणार आहे. उमेदवारांच्या खर्चाची पडताळणी करण्यासाठी स्वतंत्र ऑडिट टीम आणि भरारी पथके तैनात आहेत. प्रभाग पद्धतीमुळे एका प्रभागातून चार सदस्य निवडून द्यायचे आहेत. जरी अधिकृत मर्यादा ९ लाख असली, तरी एका प्रभागात सर्व उमेदवारांचा मिळून किमान दीड ते दोन कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
खाद्यपदार्थ आणि निश्चित दर
चहा- ७
कॉफी – ७ ते १५
पोहा / उपमा- १५ ते ३०
पुरी भाजी – ४०
राईस प्लेट (साधे जेवण)- ६५ ते १५०
मिसळ पाव / इडली- ४०
पाणी बाटली – ८ ते ३०






