…अखेर रेशन दुकानदारांचा संप मागे; आजपासून नियमित दुकाने राहणार सुरू
जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२१ । रेशन दुकानदार संघटनेने १ मे पासून विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला होता. हा संप मागे घेण्यात आला असून आज बुधवारपासून रेशन दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू राहणार आहे.
कोणत्या होत्या मागण्या?
रेशन दुकानदार संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. त्यात शासनाने स्वस्त धान्य दुकानदार यांना ५० लाखाचा विमा सुरक्षा कवच द्यावे या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांच्या पूर्तीसाठी संप पुकारला होता. तसेच बायोमेट्रिक सक्तीबाबत शासनाने स्वस्त धान्य दुकानदार यांचे आधार प्रमाणित करून अन्नधान्य वाटपाची मुभा दिली असून इतर मागण्या करीता सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे. आज बुधवारपासून सकाळी ७ ते ११ या वेळेत शहरातील व ग्रामीण भागातील सर्व स्वस्त धान्य दुकाने सुरू होतील अशी माहिती रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष अनिल अडकमोल यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
दरम्यान, सध्या काेराेनाचा काळ असून गाेर गरिबांना रेशन धान्य दुकानावर मिळणाऱ्या धान्याचा माेठा आधार मिळत आहे. अशात रेशन दुकानदारांनी संप पुकारल्यामुळे गरिब नागरिकांवर माेठे संकट उभे ठाकले हाेते; पण आता रेशन दुकानदारांचा संप मिटलल्याने त्यांना माेठा दिलासा मिळाला आहे.