गतिमंद मुलीवर अत्याचार : इशाऱ्याने कथन केला प्रकार, नराधम रिक्षाचालकाला १४ वर्ष कारावास
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑक्टोबर २०२१ । शहरापासून जवळच असलेल्या तुरखेडा शिवारात रिक्षा बंद पडल्यावर एका ९ वर्षीय गतिमंद मुलीला रात्री झोपेत उचलून नेत गव्हाच्या शेतात मद्याच्या नशेत लैंगिक अत्याचार करणाऱ्या अर्जुन अशोक पाटील (वय ३२, रा. डिकसाई, ता. जळगाव) या आरोपीला न्यायालयाने बुधवारी १४ वर्षे कारावास व ९ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. पीडिता मतिमंद असल्याने तिने मतिमंद शाळेच्या मुख्याध्यापकांसमोर जशीच्या तशी घटना कथन केली. मुख्याध्यापकांनी या इशाऱ्याचे रुपांतर बोली भाषेत करून न्यायालयाला सांगितले. त्यानुसार अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश डी. एन. खडसे यांनी हा निकाल दिला.
तुरखेडा शिवारात वीट भट्ट्यावर ९ वर्षीय पीडिता दि.२० फेब्रुवारी २०१४ रोजी रात्री तिच्या आईसोबत झोपलेली होती. रात्री ११ वाजता अर्जुन पाटील हा जळगाव येथून रिक्षा घेऊन डिकसाई जात असताना या भट्टयाजवळ त्याची रिक्षा बंद पडली. त्यावेळी तो मद्याच्या नशेत तर्रर होता.
मदतीच्या अपेक्षेने त्याने जवळच असलेल्या झोपडीत जाऊन पाहिले असता झोपलेल्या मुलीला उचलून नेऊन तो रस्त्याच्या पलीकडे पाचशे मीटर अंतरावर असलेल्या उसाच्या शेतात घेऊन गेला. रात्रीची वेळ पाहून त्याने मुलीवर अत्याचार केला. रात्री १ वाजता पीडितेची आई उठली असता मुलगी जागेवर दिसली नाही, म्हणून त्यांनी सर्वत्र शोधाशोध केली. पहाटे पाच वाजता दादरच्या शेतात विवस्त्र अवस्थेत ती दिसून आली.
नागरिकांचा आवाज आल्याने अर्जुन हा पळ काढू पाहत होता. नागरिकांना शेतातून कोणी तरी जात असल्याचा आवाज आल्याने त्यांनी पाहिले असता एक जण पळताना दिसला. नातेवाईकांनी पाठलाग करून त्याला पकडून ठेवले. पीडितेने इशारा करून झाला प्रकार आईला सांगितला होता.
नागरिकांनी अर्जुनला पकडून तालुका पोलिसांच्या स्वाधीन केले होते. दुसऱ्या दिवशी त्याच्याविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
एका साक्षीदाराचा मृत्यू, मुख्याध्यापकांची साक्ष महत्वाची
तालुका पोलीस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक प्रवीण वाडिले, हवालदार रवींद्र लुका पाटील, जितेंद्र राजाराम पाटील (सध्या नेमणूक एलसीबी) व संदीप भिकन पाटील यांनी तपासात पुरावे व साक्षीदार शेवटपर्यंत टिकवून ठेवले. यात वाडिले, पीडिता, मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक, डॉ. रुद्राजी शेळके, डॉ. कैलास पाटील, डॉ. तासखेडकर यांच्यासह १७ जणांची साक्ष घेण्यात आली. यातील एका साक्षीदाराचा उलट तपासणीपूर्वीच मृत्यू झाला. मात्र सहायक सरकारी अभियोक्त्ता नीलेश डी. चौधरी यांनी इतर साक्षीदार, पुरावे तसेच माणसुकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेवर प्रभावी युक्तिवाद केला. प्रत्येक कलमात आरोपीला दोषी धरून शिक्षा सुनावण्यात आली. पैरवी अधिकारी म्हणून देविदास कोळी व धर्मेंद्र पाटील यांनी सहकार्य केले.