जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑगस्ट २०२४ । जळगाव शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारी पुन्हा वाढताना दिसून येत आहे. याच दरम्यान जळगाव शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. शहरातील शालिमार हॉटेलमध्ये तरुणांकडून गोळीबाराची घटना दि.२७ रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलीस तपास सुरू झाला आहे.
जळगावातील जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या खात्याच्या अंतरावर असलेल्या शालीमार हॉटेलमध्ये मद्यप्राशन करताना तरुणाने अचानक बंदूक काढून जमिनीच्या दिशेने गोळीबार केल्याची घटना घडली.
तरुणाने टेबलाच्या खाली १ राउंड फायर केला. गोळीबार नंतर लागलीच सर्वजण हॉटेल बाहेर निघून गेले.दरम्यान, ज्या तरुणाने गोळीबार केला तो हद्दपार आरोपी असल्याची माहिती समोर आलीय. विशेष म्हणजे ज्या हॉटेलमध्ये पोलिसांच्या हाणामारीचा सीसीटीव्ही फुटेजाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्याच हॉटेलमध्ये गोळीबाराच्या घटनेने पुन्हा खळबळ उडाली आहे. हॉटेलमध्ये रिकामा राऊंड सापडला असून घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान, फायरिंग करणारा आणि इतरांची ओळख पटली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.