जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२४ । नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षाताई खडसे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील महाराष्ट्रातील एकमेव महिला मंत्री म्हणून, रक्षाताई खडसे यांनी आज क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालय विभागाच्या राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला आहे.
या लोकसभा निवडणुकीत रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षाताई खडसे या सलग तिसऱ्यांदा बहुमतांनी विजय झाल्या. ९ जून २०२४ रोजी त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. तब्बल वीस वर्षांच्या कालखंडानंतर जळगाव जिल्ह्याला केंद्रात मंत्री पद मिळाले आहे. यामुळे जळगाव जिल्हाला पाचव्यांदा मंत्रीपद मिळाले असून या मंत्रिपदामुळे जळगाव जिल्ह्यातील अनेक महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा सगळ्यांनाच आहे.
याच पार्श्वभूमीवर रक्षा खडसे यांनी क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. त्यात त्या म्हणतात आनंदाने ,जबाबदारीच्या भावनेने, मी राज्यमंत्री म्हणून राज्यकारभार स्वीकारला आहे. तसेच प्रभावी कामगिरीच्या आधारे भारताला एक क्रीडा शक्ती केंद्र बनवण्याची अपेक्षा, त्यांनी या ट्वीटच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.